जळगाव : कोरोना काळात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, वार्डबॉय, आदी कोरोना योद्धयांना सेवेत कायम करून घेण्याबाबत महाराष्ट्र जनक्रांती मोर्चातर्फे १२ सप्टेंबरला सकाळी साडेअकरा वाजता अजिंठा शासकीय विश्रामगृहावर कोरोना योद्धयांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी या बैठकीला कोरोना योद्धयांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जनक्रांती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष मुकुंद सपकाळे यांनी केले आहे.
रेल्वे विद्यालयात विनोबा भावेंना अभिवादन
जळगाव : सेंट्रल रेल्वे विद्यालयात शनिवारी आचार्य विनोबा भावे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यानी विनोबा भावेंच्या कार्याची माहिती देऊन, त्यांना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले. ऑनलाईन झालेल्या या कार्यक्रमाला रेल्वेचे कार्मिक अधिकारी एन. डी. गांगुर्डे, प्राचार्य सतीश कुलकर्णी, ग्रंथपाल एस. के. उपाध्याय उपस्थित होते. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.
वॉटर वेडिंग मशीन अद्यापही बंदच
जळगाव : रेल्वे स्टेशनवरील गेल्या काही महिन्यांपासून वॉटर वेडिंग मशीन बंद असल्यामुळे, प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रवाशांना अल्पदरात स्वच्छ पाणी मिळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने एका खासगी कंपनीच्या माध्यमातून तीन वर्षांपूर्वी स्टेशनवर वॉटर वेडिंग मशीन बसविले होते. मात्र, संबंधित मक्तेदाराने काही महिन्यांपासून अचानक हे मशीन बंद केले आहेत. त्यामुळे हे मशीन पुन्हा सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.
मालधक्क्याकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था
जळगाव : व. वा. वाचनालयाकडून रेल्वेच्या जुन्या मालधक्क्याकडे जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून, अनेक ठिकाणी खड्ड्यांमुळे पाणी तुंबले आहे. यामुळे माल धक्क्याकडून रेल्वे स्टेशनकडे जाणाऱ्या प्रवाशानांही अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच या ठिकाणचे पथदिवेही बंद आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.