स्वत: हातात झाडू घेऊन महापौरांनी राबविले स्वच्छता अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:19 IST2021-09-12T04:19:26+5:302021-09-12T04:19:26+5:30
जळगाव : संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके दैवत अर्थात गणपती बाप्पाचे शुक्रवारी अतिशय उत्साहपूर्ण अन् मंगलमय वातावरणात आगमन झाले. त्याच अनुषंगाने ...

स्वत: हातात झाडू घेऊन महापौरांनी राबविले स्वच्छता अभियान
जळगाव : संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके दैवत अर्थात गणपती बाप्पाचे शुक्रवारी अतिशय उत्साहपूर्ण अन् मंगलमय वातावरणात आगमन झाले. त्याच अनुषंगाने दरवर्षीप्रमाणे शहरातील विविध भागांमध्ये गणेशमूर्ती, पूजा साहित्य, प्रसाद, सुशोभीकरणासह पुष्पहार, विविध फळे यांच्या विक्रीची दुकाने थाटलेली होती. मात्र, संबंधित विक्रेत्यांनी मालाच्या विक्रीनंतर आपापल्या दुकानातील कचरा, निर्माल्याची विल्हेवाट न लावता तो तेथेच रस्त्यावर टाकलेला होता. अखेर शनिवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास महापौर जयश्री महाजन यांनी स्वत: हातात झाडू, फावडा घेऊन रस्त्यावर उतरल्या अन् शहर स्वच्छतेचे हे अभियान राबविले. जवळपास तीन-साडेतीन तासांपर्यंत हे अभियान राबविण्यात येऊन संबंधित कचरा, निर्माल्याची महापालिकेच्या ट्रॅक्टर, घंटागाडी आदी वाहनांच्या मदतीने विल्हेवाट लावण्यात आली.
शहरातील आकाशवाणी चौक ते महाराणा प्रताप चौक म्हणजेच रिंग रोड परिसर, टॉवर चौकाजवळील महात्मा गांधी रोड, अजिंठा चौक, पिंप्राळा या भागात महापालिकेच्या परवानगीने याही वर्षी ८ सप्टेंबरच्या दुपारपासून शुक्रवार, १० सप्टेंबर रोजी रात्रीपर्यंत गणेशमूर्ती, पूजा साहित्य, प्रसाद, सुशोभीकरणासह पुष्पहार, विविध फळे यांच्या विक्रीची दुकाने थाटलेली होती. मात्र, संबंधित विक्रेत्यांनी मालाच्या विक्रीनंतर आपापल्या दुकानातील कचरा, निर्माल्याची विल्हेवाट न लावता तो तेथेच रस्त्यावर टाकलेला होता. त्यामुळे आधीच कोरोनाचे संकट आणि सतत कोसळणाऱ्या पावसामुळे रोगराई उद्भवून त्या-त्या भागातील रहिवासी, नागरिकांपुढे कोणत्याही प्रकारे आरोग्याचा प्रश्न उभा राहू नये, त्यामुळे महापौर जयश्री महाजन यांनी शहरात स्वच्छता अभियान राबविले.
अभियानात यांचा होता सहभाग
महापौर यांनी राबविलेल्या या स्वच्छता अभियानात महापालिका आरोग्य विभागाचे अधिकारी लोमेश धांडे, संजय अत्तरदे, सुरेश भालेराव, सूरज तांबोळी, रमेश कांबळे, रवी सनकत, नंदू साळुंखे, वॉटर ग्रेस कंपनीचे नितीन पाटील, शोएब खाटीक व कर्मचारी, युवाशक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडिया, अमित जगताप, प्रीतम शिंदे, सागर सोनवणे, जयेश पवार, दीक्षांत जाधव यांच्यासह कार्यकर्ते, स्वयंसेवक, तसेच विविध प्रभागांत नियुक्त महापालिका सफाई कर्मचाऱ्यांचा समावेश होता.