मुलींच्या भेटीसाठी आलेल्या विवाहितेला घरातून हाकलून लावल्याच्या संतापात रेल्वेखाली केली आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:13 IST2021-06-25T04:13:25+5:302021-06-25T04:13:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : सासरच्यांकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून माहेरी असलेली माधुरी राजेंद्र पाटील (वय ३१, रा.आव्हाणे, ता.जळगाव) ...

मुलींच्या भेटीसाठी आलेल्या विवाहितेला घरातून हाकलून लावल्याच्या संतापात रेल्वेखाली केली आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : सासरच्यांकडून सतत होणाऱ्या त्रासाला कंटाळून माहेरी असलेली माधुरी राजेंद्र पाटील (वय ३१, रा.आव्हाणे, ता.जळगाव) ही विवाहिता पतीकडे असलेल्या मुलींना भेटायला आली, मात्र सासरच्यांनी मायलेकींची भेट होऊ न देता उलट घरातून हाकलून लावले. या संतापात माधुरीने प्रेम नगरातील रेल्वे रुळावर धावत्या रेल्वेखाली झोकून देत स्वत:लाच संपवून घेतल्याची घटना गुरुवारी सकाळी सहा वाजता घडली. दरम्यान, तिच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या पती राजेंद्र दिलीप जाधव याच्यासह चौघांविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, रामचंद्र वामन पवार (वय ६२,रा.पढावद, ता.शिंदखेडा, जि.धुळे) यांची मुलगी माधुरी हिचा विवाह २००७ मध्ये आव्हाणे येथील राजेंद्र दिलीप जाधव याच्याशी झाला होता. त्यांना श्रध्दा (वय ११) व पुर्वा (वय ७) अशा दोन मुली आहेत. दरम्यान, माधुरी हिला मुलीच होतात, मुलगा का होत नाही म्हणून पती व सासरच्यांनी तिचा छळ करायला सुरुवात केली. पहिली मुलगी जन्माला आली तेव्हा चार महिने तिला बघायलाही आले नाही. त्यासोबतच दूधाच्या व्यवसायासाठी माहेरुन पैशाचीही मागणी होऊ लागली. सतत तिला अपमानास्पद वागणुक मिळायला सुरुवात झाली. अशातच दुसऱ्यांदाही मुलगीच झाली. तुला मुलगा का होत नाही म्हणून तिचा अधिकच छळ होऊ लागला. या छळाला कंटाळल्याने माधुरी हिने शिंदखेडा न्यायालयात खासगी खटला दाखल केला.
मोलकरीण म्हणून नांदायला तयार, तरीही दिला नकार
माधुरी हिचा भाऊ श्रीकांत यांनी ‘लोकमत’ सांगितले की, राजेंद्र याचे बाहेर एका महिलेशी संबंध होते, असा आम्हाला संशय आहे. शिंदखेडा येथे न्यायालयात तारखेवर येत असताना तो बहिणीला त्या महिलेचा फोटो दाखवत होता. त्यामुळे बहिणीचा संताप व चिडचिड अधिक होत होती. दोन्ही मुलींमध्ये जीव असल्याने तुम्हाला तिच्याशी लग्न करायचे तर करा..तिच्यासोबत आनंदाने रहा..मी पण तुमच्या घरात राहील..बायको म्हणून नांदवत नसाल तर नको नांदवू, मोलकरीण म्हणून राहून धुणी, भांडी करेल पण नवऱ्याच्याच घरी नांदेल अशी भूमिका घेऊन तिने पतीला सांगितले होते. आम्हाला देखील तिने हा विषय सांगितला होता, त्यामुळे आम्हीही तिच्या या निर्णयाला अनुमती दिली होती. पण पती तिला नांदवायला तयारच नव्हता. घटस्फोटाचाच प्रस्ताव त्याने ठेवला होता, असे श्रीकांत यांनी सांगितले.