लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्हा परिषदेत विभागप्रमुखांची बदली झाल्यानंतर त्या ठिकाणी तातडीने नवीन अधिकारी रुजू होत नसल्याचे चित्र अनेक वर्षांपासून कायम आहे. त्यातच आता पंचायतराज समितीचा दौरा अवघ्या पंधरा दिवसांवर असताना अशा स्थितीत अनेक अधिकाऱ्यांना त्यांचा विभाग सांभाळून अन्य विभागांचाही अतिरिक्त कार्यभार सांभाळावा लागत आहे. अशात समितीच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद कामांची धावपळ होत असल्याचे चित्र आहे.
गणेश चौधरी सेवानिवृत्त झाल्यानंतर रिक्त झालेल्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर अद्यापही पूर्ण वेळ अधिकारी नसल्याने सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी के. बी. रणदिवे यांना हा कार्यभार बघावा लागत आहे. त्यातच त्यांची पुणे येथे बदली झाली आहे. यासह ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बोटे यांची अकोला येथे बदली झाल्यानंतर त्यांनी पदभार सोडला. त्यानंतर या पदावर अधिकारी आलेले नसल्याने आधीच दोन विभागांचा पदभार असलेल्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. आर. लोखंडे यांच्याकडे ग्रामपंचायत विभागाचा पदभार सोपविण्यात आला आहे. त्यांच्याकडे मूळ पदभार हा पाणी व स्वच्छता विभागाचा असून, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकांचा त्यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे. या पदावर पूर्ण वेळ नियुक्त झालेल्या मीनल कुटे यांनी अद्याप पदभार स्वीकारलेला नाही.
शिक्षण विभागाचे काय?
लघुसिंचन विभाग, समाजकल्याण विभाग, प्राथमिक शिक्षण विभाग या विभागांचा कार्यभार अद्यापही अतिरिक्त म्हणून अन्य अधिकाऱ्यांकडेच सोपविण्यात आला आहे. त्यातच माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी बी.जे. पाटील यांचीही अहमदनगर येथे बदली झाली आहे. त्यामुळे समितीचा दौरा तोंडावर असताना रिक्त पदांच्या विषयामुळे कामाचा भार व धावपळ उडाल्याचे एकंदरीत चित्र जिल्हा परिषदेत आहे.