लग्नात सहभाग घेतल्याच्या कारणावरुन मानसी बागडेच्या काकाला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 23:11 IST2020-02-09T23:11:45+5:302020-02-09T23:11:53+5:30
गुन्हा दाखल : संशयितास अटक

लग्नात सहभाग घेतल्याच्या कारणावरुन मानसी बागडेच्या काकाला मारहाण
जळगाव : जात बाहेर काढल्यानंतरही तुम्ही लग्न कार्यात का आले? म्हणून मानसी बागडेचे काका विजय प्रधान बागडे व त्यांचा मुलगा कुणाल या दोघांना मारहाण केल्याची घटना रविवारी सायंकाळी कंजरवाडा भागात घडली. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पंच गोपाल उर्फ सन्नाटा दशरथ माचरे याला अटक करण्यात आली आहे.
जाखनी नगर कंजरवाड्यात रविवारी लग्न सोहळा होता. त्या सोहळ्यात मानसीचे काका विजय बागडे व चुलत भाऊ कुणाल याने पाण्याचे जार पुरविले होते. सायंकाळी रिकामे जार घेण्यासाठी विजय बागडे यांचा मुलगा कुणाल गेला असता पंच दशरथ माचरे याचा मुलगा कालु उर्फ सन्नाटा याने तुम्हाला जातीच्या बाहेर काढले आहे, तू येथे कसा आला म्हणून विचारणा करुन वाद घातला. यावेळी दोघांनी कुणाल व विजय बागडे यांना मारहाण केली. या घटनेनंतर विजय बागडे यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठून निरीक्षक रणजीत शिरसाठ यांना घटनेची माहिती दिली. शिरसाठ यांनी लागलीच सहायक निरीक्षक अमोल मोरे, उपनिरीक्षक विशाल वाठोरे, सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, रामकृष्ण पाटील, विजय पाटील, सचिन चौधरी, सचिन पाटील व मुकेश पाटील यांचे पथक रवाना केले. या पथकाने गोपाल उर्फ सन्नाटा दशरथ माचरे याला अटक केली. उर्वरित संशयितांचा शोध सुरु होता. दरम्यान, मानसी बागडेच्या आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेले पंच अद्याप फरार आहेत.