विद्युत पोल व जनित्रे हलविण्याचा मार्ग मोकळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:13 IST2021-07-01T04:13:49+5:302021-07-01T04:13:49+5:30
एरंडोल : एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांमुळे म्हसावद रस्त्यावरील २ विद्युत जनित्रे व ६ विद्युत ...

विद्युत पोल व जनित्रे हलविण्याचा मार्ग मोकळा
एरंडोल : एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांमुळे म्हसावद रस्त्यावरील २ विद्युत जनित्रे व ६ विद्युत पोल स्थलांतरासाठी कंत्राटदाराकडून हालचाली सुरू झाल्याचे दिसत आहे.
त्यामुळे आता जवळपास अडीच वर्षांपासून वीज वितरण मंडळाच्या सबस्टेशनपासून ते म्हसावद नाक्यापर्यंतचे राज्य महामार्गाचे काँक्रिटीकरणाचे काम हे रखडलेले होते.
म्हसावद राज्य महामार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम नेरी गावापासून सुरू झाले होते; पण एरंडोल शहरानजीक डी. डी. एस. पी. महाविद्यालयाची नवी इमारत व सबस्टेशनपासून ते म्हसावद नाक्यापर्यंत २ जनित्रे व ६ विद्युत पोल रस्त्याच्या कामात अडथळा ठरत होते. त्यामुळे सुमारे ३ किलोमीटरच्या रस्त्याच्या कामाला ब्रेक लागल्यामुळे परिणामी वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत होते. तसेच छोटे-मोठे अपघातही या महामार्गावर घडलेले आहेत.
आमदार चिमणराव पाटील यांनी या प्रकरणी वैयक्तिक लक्ष घालून रस्त्याच्या कामास गती देण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम खात्याच्या यंत्रणेला केली आहे.