महाविकास आघाडी सरकार अस्थिर, नव्या सरकारमध्ये मंत्री कोण?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2022 16:53 IST2022-06-23T16:53:30+5:302022-06-23T16:53:54+5:30
Jalgoan : जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे शिंदे यांच्या गोटात दाखल झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांमध्ये नव्याने बदल झालेले दिसून येत आहेत.

महाविकास आघाडी सरकार अस्थिर, नव्या सरकारमध्ये मंत्री कोण?
जळगाव : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यासह जिल्ह्याचे राजकारण अस्थिर झाले आहे. महाविकास आघाडी सरकार केव्हाही कोसळण्याची शक्यता असताना जिल्ह्यातील मंत्रीपदाबाबत पुन्हा नव्याने चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे भाजपासोबत गेल्यास विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील हे मंत्रीपदी कायम राहतात की पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील व पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील यांची मंत्रीपदाची लाॅटरी लागते याबाबत चर्चा आता सुरू झाल्या आहेत.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकार बरखास्त होणार असे सूचक विधान केले आहे. त्यातच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील हे शिंदे यांच्या गोटात दाखल झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकीय समीकरणांमध्ये नव्याने बदल झालेले दिसून येत आहेत.
गुलाबराव पाटील : पूर्वीच्या युती व आताच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेले गुलाबराव पाटील यांच्याकडे सहकार व पाणीपुरवठा विभाग या मंत्रीपदाचा अनुभव आहे. त्यातच पक्ष संघटन व वक्तृत्व या दोन्ही गोष्टी त्यांच्याकडे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेत उपनेते म्हणून आहेत. मात्र एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत जास्त जवळीक आहे. मनपामधील सत्तांतरावेळी पालकमंत्री असतांनाही शिंदे यांनी गुलाबराव यांना दूर ठेवले होते.
चिमणराव पाटील : पारोळा व एरंडोलचे आमदार चिमणराव पाटील हे शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार आहेत. त्यांचा दूध संघ, जिल्हा बॅंकेसह सहकार क्षेत्रातील दांगडा अनुभव आहे. विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासाेबत त्यांचे फारसे सख्य नाही. शिंदे यांच्या बंडखोरीनंतर सुरतकडे रवाना झालेल्या आमदारांमध्ये सर्वात आधी चिमणराव पाटील यांचा समावेश आहे. त्यांचे सर्व जिल्ह्यातील बहुतांश राजकीय नेत्यांसोबत चांगले संबंधदेखील आहेत.
किशोर पाटील : सलग दोन पंचवार्षिकपासून आमदार असलेले पाचोऱ्याचे किशोर पाटील यांची शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत जवळीक आहे. सार्वजनिक बांधकाम व नगरविकास विभागाच्या माध्यमातून आमदार किशोर पाटील यांना आपल्या मतदार संघासाठी मोठ्या प्रमाणात निधी शिंदे यांच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे. गेल्या वेळी शिंदे यांच्या पाचोरा दौऱ्यावेळी मंत्रीपद बदलाविषयी चर्चा होऊन आमदार किशोर पाटील यांना राज्यमंत्रीपद किंवा महामंडळाचे अध्यक्ष करण्याबाबत चर्चा झाल्याची त्यावेळी चर्चा होती. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी आता भाजपासोबत जाऊन सरकार तयार केल्यास आमदार किशोर पाटील यांच्या मंत्रीपदाबाबत विचार होऊ शकतो.