जळगाव शहरात मध्यवर्ती ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नवीन कार्यालयाचे काम सुरू आहे. या कार्यालयाचे येत्या ४ जून रोजी उद्घाटन होणार आहे. मात्र, त्याआधीच हे कार्यालय खूप चर्चेत आले. या कार्यालयामध्ये भूत असल्याची अफवा पसरली. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये घबराट पसरली असून ते कार्यालयात जायला नकार देत आहेत. दरम्यान, शिवसेना नेते आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. "या सगळ्या अफवा असून चार जूननंतर मीच या कार्यालयात जाणार आहे, अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका", असे आवाहन त्यांनी कार्यकर्यांना केले.
विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच जळगाव शहरातील पांडे चौक परिसरात हे मध्यवर्ती कार्यालय उभारले. येत्या ४ जून रोजी या कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. मात्र, त्याआधीच या कार्यालयामध्ये भूत असल्याची भिती पसरली आहे. ही भीती दूर करण्यासाठी स्वत: पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पुढाकार घेतला. गुलाबराव पाटील यांनी आपल्या भाषणादरम्यान ही केवळ अफवा असल्याचे म्हटले. कोणत्याही अंधश्रद्धेला बळी पडू नका, मी स्वतः या कार्यालयात नियमित बसणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे उद्घाटन झाल्यानंतर कार्यकर्ते या कार्यालयात जातात किंवा नाही? हे पाहावे लागणार आहे.