Maharashtra Election 2019: ...अन् खडसे म्हणाले; राज्यात महाआघाडीचं सरकार येणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 15:59 IST2019-10-08T15:55:39+5:302019-10-08T15:59:38+5:30
राज्यात सरकार महाआघाडीचेच येणार, असे सूतोवाच करताच एकनाथराव खडसे यांना झालेली चूक ध्यानात आली.

Maharashtra Election 2019: ...अन् खडसे म्हणाले; राज्यात महाआघाडीचं सरकार येणार
रावेर ( जळगाव): दसर्याच्या मुहूर्तावर रावेर येथे प्रचार नारळ वाढवताना राज्यात सरकार महाआघाडीचेच येणार, असे सूतोवाच करताच एकनाथराव खडसे यांना झालेली चूक ध्यानात आली. काही क्षणार्धात त्यांनी सावरत, आमच्याकडे ते नाथाभाऊंला पाडण्यासाठी आघाड्या बिघाड्या सुरू आहेत ना ! त्यामुळे महाआघाडी चुकून तोंडात आलं. महायुतीचेचं राज्य येणार, असा आत्मविश्वास त्यांनी प्रकट केला.
यावेळी खासदार रक्षा खडसे, उमेदवार हरिभाऊ जावळे उपस्थित होते. खडसे म्हणाले, बरेच रामायण घडले. महाभारताचाही पहिला अध्यायही आटोपला. मात्र नाथाभाऊ भाजपामध्येच आहे. आता सब मिलके आओ और नाथाभाऊंको गिराओ.. म्हणून आघाड्या बिघाड्या सुरू आहेत. अरे हा नाथाभाऊ अभिमन्यू नाही, तर अर्जुन आहे. रणांगणातून बाहेर निघणं चांगले जाणतो. तो कधी अडकणार नाही. मिल गया तो मिल गया नही तो छोड दिया... तीर लगा तो ठीक है.. नही तो कमान अपने पास है... असा विरोधकांचा समाचार घेत, सर्व समाजाच्या हितासाठी व कल्याणासाठी आपण लढत देत आहे.
कोण्या एका समाजाच्या नेतृत्वासाठी आपण लढत देत नसल्याची कोपरखडी त्यांनी हाणली. आदिवासी, दलित अल्पसंख्याक, बहुजन, तळागाळातील शेवटच्या घटकातील दीनदुबळ्यांसाठी पोटच्या मुलासारखी आम्ही सेवा केली आहे. म्हणून आम्हाला आपल्याकडे हक्काचे मतदान मागण्याचा अधिकार आहे. आणि तो आम्ही हक्काने मिळवणारच, असा दावाही एकनाथराव खडसे यांनी केला.