Lok Sabha Election 2019 : ए. टी. पाटलांच्या शालकासह आप्तांचा राष्ट्रवादीत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 13:11 IST2019-04-16T13:10:25+5:302019-04-16T13:11:21+5:30
राजकीय वतुर्ळात खळबळ

Lok Sabha Election 2019 : ए. टी. पाटलांच्या शालकासह आप्तांचा राष्ट्रवादीत प्रवेश
चाळीसगाव : जळगाव लोकसभा मतदार संघाचे खासदार ए.टी. पाटील यांचे शालक संजय चिंतामण आमले तसेच अन्य त्यांच्या आप्तांनी सोमवारी भाजपला रामराम ठोकून माजी आमदार राजीव देशमुख यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने राजकीय वतुर्ळात खळबळ उडाली आहे.
खासदार पाटील यांना पक्षाने तिकिट नाकारल्यानंतर प्रचंड घडामोडी झाल्या. आमदार स्मिता वाघ यांना औटघटकेसाठी तिकिट जाहीर झाले. तर ऐन वेळेस त्यांचा पत्ता कट करून आमदार उन्मेष पाटील यांना तिकिट देण्यात आले. या सर्व घटनाक्रमात आधी ए.टी. पाटील यांचे कट्टर समर्थक असणारे आमदार उन्मेष पाटील यांच्या प्रचारात खासदार पाटील उतरणार असल्याची चर्चा होती. मात्र त्यांनी उन्मेष पाटील हेदेखील आपल्याला हटविण्यासाठी रचण्यात आलेल्या कटात सहभागी असल्याचा आरोप करून त्यांचा प्रचार करण्यास साफ नकार दिला. आता निवडणुकीचा प्रचार ऐन शिखरावर पोहचत असतांना खासदार पाटील समर्थकांनी भाजप विरुद्ध हालचाली सुरू केल्याचे दिसून येत असून याचा प्रारंभ चाळीसगावातून झाला आहे.
चाळीसगाव तालुक्यातील वडाळा-वडाळी येथील ए.टी. पाटील यांची सासुरवाडी आहे. ते पूर्वी राष्ट्रवादीतच होते. त्यांचे शालक संजय आमले हे सध्या भाजपचे सक्रीय कार्यकर्ते होते. त्यांनी नुकताच स्वत:सह आपले सहकारी अशोक आमले, रितेश आमले, रमेश सूर्यवंशी, संदीप आमले, किशोर शेवरे, बाळू आमले, हिलाल अहिररराव आणि बाळू मोरे यांच्यासह राष्ट्रवादीत प्रवेश केला.