बालपक्षीमित्राच्या प्रसंगावधानाने वाचले अनेक पक्षी-सशांचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:15 IST2021-09-13T04:15:26+5:302021-09-13T04:15:26+5:30
बिडगाव, ता. चोपडा : सातपुडा निसर्ग संवर्धन संस्था, चोपडा यांच्यातर्फे यावर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत सातपुडा वनक्षेत्रात ...

बालपक्षीमित्राच्या प्रसंगावधानाने वाचले अनेक पक्षी-सशांचे प्राण
बिडगाव, ता. चोपडा : सातपुडा निसर्ग संवर्धन संस्था, चोपडा यांच्यातर्फे यावर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत सातपुडा वनक्षेत्रात महाबीजरोपण कार्य सुरू आहे. दि. ५ सप्टेंबरला चौगाव गावाजवळील विजयगड किल्ल्याच्या पायथ्याशी बीजारोपणाचे काम सुरू असताना बालपक्षीमित्र आर्यदीप पाटील याला पक्षी व ससे पकडण्याचे फासे आढळून आले. त्याने याबद्दल तत्काळ हेमराज पाटील यांना माहिती दिली व परिसरात शोध घेऊन आर्यदीप पाटील, हेमराज पाटील, अश्फाक पिंजारी, योगेश देवराज, अश्विनी पाटील यांनी शिकारीसाठी लावलेले अनेक फासे शोधून काढले व ते ताब्यात घेतले.
याठिकाणी अनेक पक्षी प्रजाती व ससे आढळतात. जसे पेंटेड व ग्रे फ्रांकोलीन, क्वेल्स, डवज, ककूल, स्टर्लिंग्ज, लेपविंग्ज, इग्रेट्स, केस्ट्रेल, रोल्लर्स, बुलबुल, हुप्पो, बेबलर्स, ड्रॉन्गो, ग्रे हॉर्नबिल आदी जाळ्यात अडकलेल्या पक्ष्यांना नंतर ताब्यात घेऊन मांसासाठी वापर केला जातो. यापूर्वीदेखील या ठिकाणी अनेकदा असे फासे आढळून आलेले आहेत.
या अर्थी याठिकाणी शिकाऱ्यांची टोळी सक्रिय आहे. जंगलात पेट्रोलिंग करणाऱ्या वनरक्षकांनी अज्ञात शिकाऱ्यांवर लक्ष ठेवून त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणीही लेखी निवेदनाद्वारे सातपुडा निसर्ग संवर्धन संस्थेतर्फे वनविभागास करण्यात आली. बालवयातच अनेक पक्षी ओळखणाऱ्या, तसेच पक्षी निरीक्षण शिबिरे, पक्षी संवर्धन, बर्ड रेस्क्यू, जागतिक चिमणी दिवस, वृक्ष लागवड व विविध निसर्ग संवर्धन कार्यात सहभागी होणाऱ्या बालपक्षीमित्र आर्यदीप पाटील याने ‘बर्ड अँड रॅबिट स्नेअर्स’ लावणाऱ्या अवैध शिकाऱ्यांचा मनसुबा उधळून लावल्याने वनविभाग, टीम सातपुडा, विवेकानंद विद्यालय परिवार, आप्त, स्नेही यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात येत आहे.