लसींच्या डोसपेक्षा सीरिंजचा कमी पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:19 IST2021-09-12T04:19:12+5:302021-09-12T04:19:12+5:30
आज येण्याची शक्यता : शहरात दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या घटली डमी ११६४ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोविड प्रतिबंधात्मक ...

लसींच्या डोसपेक्षा सीरिंजचा कमी पुरवठा
आज येण्याची शक्यता : शहरात दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या घटली
डमी ११६४
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोविड प्रतिबंधात्मक लसींच्या डोसेसच्या तुलनेत एडी सीरिंजचा पुरवठा कमी झाल्याने याचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र, रविवारी किंवा सोमवारी शहरातील केंद्रावर या सीरिंजचा पुरवठा होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. केंद्र शासनाकडूनच या सीरिंजचा पुरवठा कमी झाल्याने राज्यात काही ठिकाणी तुटवडा निर्माण झाल्याची माहिती आहे.
एडी सीरिंज कमी असल्याने काही ठिकाणी बालकांच्या लसीकरणासाठी वापरण्यात येणारी २ सीसी सीरिंज वापरण्यात येत असते. ही सीरिंज वापरल्यानंतर लसींच्या डोसचे वेस्टेज काही प्रमाणात वाढण्याची शक्यता असते. मात्र, अद्यापपर्यंत शहरात अशा प्रकारचा बदल झाला नसल्याने वैद्यकीय अधिकारी डॉ.मनिषा उगले यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून लसीकरण मोहीम वेगात सुरू असून, आता दुसऱ्या डोस घेणाऱ्यांची संख्या काहीशी घटली आहे.
काय आहे एडी सीरिंज?
एडी सीरिंज म्हणजे ऑटो डिस्पोजेबल सीरिंज होय. याचा कोराना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत ही लस देण्यासाठी उपयोग होत आहे. याचा केंद्र सरकारकडून पुरवठा होत आहे. ही सीरिंज ०.५ एमएल भरली गेल्यानंतर ऑटो लॉक होते. एका व्हायलमधून बारा डोसपर्यंत दिले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यात उपलब्ध डोसपेक्षा अधिक लसीकरण झाले आहे. ही सीरिंज एका डोस नंतर फेकली जाते.
२ सीसी सीरिंज कशी असते?
या सीरिंजच्या लहान मुलांच्या लसीकरणासाठी वापर केला जातो. एडी सीरिंजपेक्षा ती जाड असल्याने त्यात दीड एमएलपर्यंत डोस बसतो. त्यामुळे एडी सीरिंजऐवजी या सीरिंजचा वापर झाल्यास काही प्रमाणात डोस वेस्टेज होण्याची शक्यता आहे. कारण त्यासाठी तेवढ्या अगदी अचूक सीरिंज भरल्या जाणे गरजेचे आहे.
जिल्ह्याला रोज किती लागतात सीरिंज?
जेवढे लसीकरण झाले, त्या प्रमाणातच या सीरिंज जिल्ह्यात एका दिवसाला लागत असल्याचे लसीकरण अधिकारी डॉ.समाधान वाघ यांनी सांगितले. जर दहा व्यक्तिंचे लसीकरण झाले, तर दहा किंवा एखादी सिरिंज खराब झाल्यास ११ सीरिंज लागतात. याच प्रमाणात जिल्ह्यात या सीरिंज लागत आहेत.
वेस्टेज नाहीच
जिल्ह्यात आतापर्यंत उपलब्ध डोसपेक्षा अधिक लसीकरण झाले आहे. वेस्टेज म्हणून पाठविण्यात येत असलेल्या डोसमध्येही लसीकरण केले जात आहे. वेस्टेजचे प्रमाण उणे ८ टक्के आहे. याचा अर्थ आलेल्या डोसेसपेक्षा अधिक लसीकरण करण्यात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला यश आहे, शिवाय अद्याप एडी सीरिंजच वापरली जात आहे. त्यामुळे सद्यातरी डोस वेस्टेज नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
कोट
एडी सीरिंजचा व बालकांच्या लसीकरणाच्या २ सीसी सीरिंजचा साठा हा वेगळा आहे. सीरिंजचे प्रमाण कमी आहे. मात्र, तुटवडा सध्या तरी नाही. लवकरच त्या जिल्ह्याला प्राप्त होणार आहे. त्यामुळे अद्याप एडी सीरिंजचाच वापर होत आहे. या सीरिंज एका वेळी एकाच व्यक्तीला वापरल्या जातात.
- डॉ.समाधान वाघ, लसीकरण अधिकारी.