देशाचे नेतृत्व करणे हीच आहे संत कुटुंबाची ‘समृद्धी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:53 IST2021-02-05T05:53:17+5:302021-02-05T05:53:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राजपथवर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सर्व मु. जे. महाविद्यालयाच्या एनसीसी युनिटची छात्रसैनिक सीनिअर ...

देशाचे नेतृत्व करणे हीच आहे संत कुटुंबाची ‘समृद्धी’
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राजपथवर होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सर्व मु. जे. महाविद्यालयाच्या एनसीसी युनिटची छात्रसैनिक सीनिअर अंडर ऑफिसर समृद्धी हर्षल संत हिने ऑल इंडिया परेड कमांडर म्हणून नेतृत्व केले. हा सोहळा राजपथावरून पाहणारे तिचे वडील हर्षल, आई अर्चना, भाऊ सार्थक यांनी तसेच जळगावातील घरी बसून सोहळा पाहणारे आजी-आजोबा प्रेरणा आणि चंद्रकांत संत यांनीही हीच आमच्या परिवाराची खरी समृद्धी असल्याची भावना व्यक्त केली आहे. समृद्धीने देशाचे नेतृत्व करीत आमची मान उंचावली असल्याची भावना संत कुटुंबाने ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
समृद्धीच्या आजी प्रेरणा आणि आजोबा चंद्रकांत हे दिल्लीला जाऊ शकले नाहीत. त्यांनी जळगावला घरी बसूनच हा सोहळा पाहिला. त्यांनी सांगितले की, देशातील मुलींच्या एनसीसी कॅडेटचे नेतृत्व करायला मिळणे ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. हे सगळे बघताना आमचे डोळे भरून आले होते. संत घराण्याचे नाव नातीने मोठे केले. आम्हाला तिचा अभिमान आहे.
कुटुंबाने पाहिला राजपथवरून सोहळा
समृद्धीचे वडील, आई आणि भाऊ हे राजपथवर सोहळा पाहण्यासाठी गेले होते. तिचे वडील हर्षल संत यांनी सांगितले की, हा एक रोमांचकारी अनुभव होता. प्रत्यक्ष मुलीला राजपथवर परेड करताना पाहणे ही आमच्यासाठी भाग्याची आणि अभिमानाची बाब होती. तिची मेहनत आणि जिद्द येथे फळाला आली.’
तिच्या यशात १८ महाराष्ट्र बटालियनचे समादेशक अधिकारी कर्नल प्रवीण धिमान, लेफ्टनंट योगेश बोरसे, सीटीओ गोविंद पवार, ज्योती मोरे, सुभेदार मेजर कोमल सिंग, आरुषी आणि माने यांनी मार्गदर्शन केल्याचेही त्यांच्या कुटुंबाने नमूद केले.
दोन वर्षांपासून सुरू होती तयारी
समृद्धी ही सध्या वाणिज्य शाखेत तृतीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. राजपथावर परेडसाठी दोन वर्षांपासून प्रयत्न करीत आहे. या परेडसाठी आपली निवड व्हावी, म्हणून ती सातत्याने मेहनत घेत होती. आता १८ महाराष्ट्र बटालियनमधून तिची एकटीचीच निवड झाली होती.