भडगाव तालुक्यातील महिंदळे ते वडजी फाटा रस्ता मोजतोय शेवटच्या घटिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2019 15:53 IST2019-01-07T15:50:53+5:302019-01-07T15:53:03+5:30
महिंदळे ते वडजी फाटा हा वर्दळीचा एकेरी एरंडोल ते आर्वी हा मार्ग आहे, पण हा रस्ता खड्ड्यात आहे की रस्त्यात खड्डे हेच समजत नाही. या रस्त्यावर चालताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे व साईडपट्ट्या खोल झाल्यामुळे अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे

भडगाव तालुक्यातील महिंदळे ते वडजी फाटा रस्ता मोजतोय शेवटच्या घटिका
महिंदळे, ता भडगाव, जि.जळगाव : महिंदळे ते वडजी फाटा हा वर्दळीचा एकेरी एरंडोल ते आर्वी हा मार्ग आहे, पण हा रस्ता खड्ड्यात आहे की रस्त्यात खड्डे हेच समजत नाही. या रस्त्यावर चालताना वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागते. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे व साईडपट्ट्या खोल झाल्यामुळे अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे, तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. अशी या अत्यंत रस्त्याची वाईट अवस्था झाली आहे.
महिंदळे ते वडजी फाटा या आठ कि.मी. रस्त्याच्या दैनावस्थेमुळे दर दोन तीन दिवसांनी छोटे-मोठे अपघात होतच असतात. या रस्त्यावर वळणेही मोठ्या प्रमाणात आहेत व रस्त्यावर मोठमोठे खड्डे असल्यामुळे व साईडपट्ट्या खोल झाल्यामुळे वाहनधारक खड्डे चुकवण्याच्या नादात एकमेकांवर आढळतात किंवा खड्डे चुकवताना रस्त्यावर पडतात. या रस्त्यावर अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे तर काही अंथरूणावर पडले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागाची मलमपट्टीही तात्पुरत्या स्वरूपात होते. खड्डे मात्र तसेच असतात. सर्वत्र रस्ता कामाला गती दिसत आहे पण या रस्त्यावरील खड्ड्यांकडे विभागाचे दुर्लक्ष होत आहे. भडगाव ते मालेगाव यातील अंतर कमी करणारा हा एरंडोल ते आर्वी रस्ता नूतनीकरणापासून कोसोदूर आहे.
महिंदळे ते वडजी फाटा रस्त्यावर खरोखर मोठमोठे खड्डे असल्यामुळे व साईडपट्ट्या खोल झाल्यामुळे या रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम त्वरित हाती घेण्यात येईल व या रस्त्याचे नूतनीकरण लवकरच होणार आहे. कामही मंजूर आहे, पण प्रशासकीय मान्यता मिळताच कामाला सुरुवात होईल.
-वीरेंद्र राजपूत, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, भडगाव