जळगाव : शहरात चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले असून रामेश्वर कॉलनी व महाबळ मधील अरविंद नगरात घरफोडी झाल्याच्या घटना रविवारी उघडकीस आल्या. रामेश्वर कॉलनीत सुनंदा किराणा स्टोअर्स हे दुकान फोडून २ लाख ४९ हजार ८०० तर अरविंद नगरात सत्यनारायण मुन्नालाल गौतम यांच्या घरातून ५४ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला आहे. याप्रकरणी अनुक्रमे एमआयडीसी व रामानंद नगर पोलिसात गुन्हे दाखल झाले आहे.
रामेश्वर कॉलनीतील तुळजा माता नगरात सुरेश तानाजी पाटील हे पत्नी, मुलगा, सून व नातवंडे यांच्यासह वास्तव्यास आहेत. घरातच सुनंदा किराणा स्टोअर्सचे दुकाने असून त्यावर उदरनिर्वाह भागवितात. शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास पाटील यांनी दुकानातील दागिने व रोकड व्यवस्थित असल्याची खात्री करुन दुकान बंद केले होते. रविवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास सुरेश पाटील यांचा मुलगा व पत्नी दोन्ही जण दुकान उघडण्यासाठी गेले असता, त्यांना दुकानाचे शटर अर्धवट वाकविलेले तर कुलपाची पट्टी तुटलेली दिसली. दुकानात पाहणी केली असता साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. दागिने व रोकड ठेवलेली बरणी तसेच डबा मिळून आला नाही. बरणीतील दागिने व डब्यातील ६० हजार रुपयांची रोकड असा चोरट्यांनी एकूण २ लाख ४९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याचे समोर आले. चोरी झाल्याची खात्री झाल्यावर सुरेश पाटील यांनी एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा, पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे तसेच सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी सुरेश पाटील यांच्या तक्रारीवरुन एमआयडीसी पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
दागिने लांबविले
महाबळमधील अरविंद नगर भागातील सत्यनारायण मुन्नालाल गौतम यांच्या बंद घराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी १५ ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी, पाच ग्रॅमच्या कानातील रिंगा व चांदीचे पायल असा एकूण ५४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल २८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत चोरट्यांनी लांबविला आहे. रविवारी हा प्रकार उघड झाला. गौतम यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास संजय सपकाळे करीत आहेत.