मस्करी नको करू बोलल्याचा राग आल्याने तरूणावर चाकू हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 22:33 IST2019-09-14T22:32:40+5:302019-09-14T22:33:46+5:30
शिरसोली येथील घटना : तरूण गंभीर जखमी ; जिल्हा रूग्णालात झाली शस्त्रक्रिया

मस्करी नको करू बोलल्याचा राग आल्याने तरूणावर चाकू हल्ला
जळगाव- दीपकची मस्करी नको घेऊ असे, बोलल्याचा राग येऊन पन्ना उर्फ पद्माकर प्रभाकर धनगर याने विजय गंगाराम गवळी (वय-२५, रा़ शिरसोली) या तरूणावर चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शिरसोली गावात घडली़ पोटात गंभीर दुखापत झाल्यामुळे विजय याला त्वरित जिल्हा रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल्यानंतर त्याच्यावर रात्रीच शस्त्रक्रिया करण्यात आली़
विजय गवळी हा शिरसोली येथे कुटूंबीयांसह वास्तव्यास आहे़ शनिवारी रात्री तो कुटूंबीयांसह पुण्याला जाणार होता़ मात्र, त्यापूर्वी वडीलांनी बचत गटाचे १ हजार ३१० रूपये संबंधित व्यक्तीला देऊन ये असे सांगितले़ त्यानुसार विजय हा मित्र दीपक पुंडलिक भील आणि गणेश भगवान बारी यांच्यासोबत दुचाकीने पैसे देण्यासाठी निघाला़ दरम्यान, मित्राला तंबाखू घ्यायची असल्यामुळे गावातीलच एका पान टपरीजवळ विजयने दुचाकी थांबविली़ त्याचवेळी पन्ना धनगर त्याठिकाणी आला व त्याने दीपक याची मस्करी घेऊन शिविगाळ करायला लागला़ त्यावर विजय याने दीपकची मस्करी नको घेऊ असे, सांगताच पन्ना याने विजयला शिविगाळ करण्यास सुरूवात केली़ नंतर हातातील चाकूने डाव्या हातावर वार केला़
चाकूने पोटात केला वार
हातावर चाकूचा वार होताच विजय हा जखमी झाला़ नंतर पन्ना याने त्याच्या हातातील चाकूने विजयच्या पोटात दोन वेळा वार करत त्यास गंभीर जखमी केली़ पोटात गंभीर इजा झाल्यामुळे रक्तस्त्राव होण्यास सुरूवात झाली़ व तो खाली कोसळला़ नंतर पन्ना हा तेथून पसार झाला़
ग्रामस्थांनी नेले जिल्हा रूग्णालयात
विजय हा रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत पडलेला ग्रामस्थांना आढळून आला़ तेव्हा योगेश लावणे, हेमंत पाटील तसेच विजय कोल्हे, भैय्या न्हावी यांच्यासह ग्रामस्थांनी त्यास त्वरित उचलून वाहनातून जिल्हा रूग्णालयात नेले़ दरम्यान, चाकू हल्ला झाल्याची गावात बातमी पसरताच सर्वत्र खळबळ उडाली़