भडगाव गिरणा पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:15 IST2021-09-13T04:15:21+5:302021-09-13T04:15:21+5:30
भडगाव ते पेठमार्गाने जाणारा गिरणा नदीवरील ब्रिटिशकालीन पुलामुळे दळणवळणासाठी मोठ्या सोयीचे ठरत आहे. या पुलावर व पुलाला जोडणाऱ्या रस्त्यावर ...

भडगाव गिरणा पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य
भडगाव ते पेठमार्गाने जाणारा गिरणा नदीवरील ब्रिटिशकालीन पुलामुळे दळणवळणासाठी मोठ्या सोयीचे ठरत आहे. या पुलावर व पुलाला जोडणाऱ्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले होते. वाहनधारकांना वाहने चालविणे त्रासाचे ठरताना दिसत होते. याबाबत ‘लोकमत’ने यापूर्वी वृत्त मांडले होते.
बांधकाम विभागाने त्यावेळी गिरणा नदीच्या पुलावरील व पुलाला जोडणाऱ्या रस्त्याच्या डागडुजीचे काम करून डांबरीकरणाचे कामही केले होते. या पुलाच्या दुरुस्तीचे काम व पुलाला रंगरंगोटीचे काम केले होते. यामुळे हा पूल वापरास सोयीचा व शहरात सौंदर्यात भर घालणारा ठरत होता. मात्र पावसाळ्यात सततच्या पाण्यामुळे पुलाच्या भागात ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहेत. तसेच पुलाच्या मागील व पुढील भागातही मोठमोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले आहे.
खड्डयात रस्ता की रस्त्यात खड्डा तेच समजत नाही. वाहनधारकांना खड्डे टाळत मार्ग काढावा लागतो. यामुळे सध्या वाहनधारक खूपच त्रस्त आहेत. गिरणा नदी पुराने दुथडी वाहत असतानाही वाहने नेहमी या पुलावरून वापरतात. भडगावहून कोळगाव, पारोळा, कासोदा मार्गाने वाहनांची मोठी वर्दळ असते. खड्डे टाळताना वाहनांचे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले आहे, अशी चर्चा वाहनधारकातून होताना दिसत आहे. यामुळे वाहनधारकातून संताप व्यक्त होत आहे.
तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ या पुलावरील व पुलालगत रस्त्यावरचे खड्डे बुजवून डागडुजीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी होताना दिसत आहे. याकडे आमदार किशोर पाटील यांनीही लक्ष द्यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
120921\12jal_1_12092021_12.jpg
भडगाव गिरणा नदीवरील पुलाच्या भागात खड्ड्यातून मार्ग काढताना वाहनधारक.