पुणे येथून जळगावला मुलांच्या भेटीसाठी आलेला तरुण अपघातात ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 22:21 IST2018-06-12T22:21:14+5:302018-06-12T22:21:14+5:30
वाहतूक कोंडीच्या वेळी रस्त्यातून मार्गक्रमण करीत असताना मागून आलेल्या दहा चाकांच्या कंटनेरने जोरदार धडक दिल्याने अनिल छगन नन्नवरे (वय ३२, रा.बांभोरी, ता.धरणगाव) हा तरुण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री आठ वाजता बांभोरी गावाजवळ सावली वसतीगृहासमोर घडली. अनिल हा नारायणगाव, पुणे येथे एस.टी.महामंडळात चालक होता.

पुणे येथून जळगावला मुलांच्या भेटीसाठी आलेला तरुण अपघातात ठार
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,१२ : वाहतूक कोंडीच्या वेळी रस्त्यातून मार्गक्रमण करीत असताना मागून आलेल्या दहा चाकांच्या कंटनेरने जोरदार धडक दिल्याने अनिल छगन नन्नवरे (वय ३२, रा.बांभोरी, ता.धरणगाव) हा तरुण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी रात्री आठ वाजता बांभोरी गावाजवळ सावली वसतीगृहासमोर घडली. अनिल हा नारायणगाव, पुणे येथे एस.टी.महामंडळात चालक होता.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवारी सायंकाळी बांभोरी पुलाजवळ मालवाहू चारचाकी गाडी पंक्चर झाल्याने वाहतूक कोंडी झाली होती. दीड तासाने वाहतूक सुरळीत झाल्यानंतर पोलिसांनी एकेरी वाहतूक सुरु केली होती. त्यावेळी अनिल नन्नवरे हा पाळधी येथून दुचाकीने येत असताना एकेरी वाहतुकीतून मार्गक्रमण करताना मागून भरधाव वेगाने आलेल्या कंटनेरने (क्र.एम.एच.४० वाय.४५३१) अनिल याला जोरदार धडक दिली. त्यामुळे तो दुचाकीच्या खाली पडला. डोक्याला मार लागल्याने तो जागीच गतप्राण झाला. गावाजवळच हा अपघात झाल्याने गावकºयांनी तातडीन घटनास्थळी धाव घेतली. गावातीलच तरुण ठार झाल्याने गावकरी आक्रमक झाले.
मुलांच्या भेटीसाठी आला...
अनिल हा दोन वर्षापूर्वी नारायणगाव, पुणे आगारात चालक म्हणून नोकरीला लागला होता. मुलगा मोहीत व मुलगी लक्ष्मी यांची शाळा सुरु होणार असल्याने त्यांच्या भेटीसाठी तो सोमवारीच घरी आला होता. याच काळात भावाच्या मुलीचाही वाढदिवस होता.मंगळवारी मुलांसाठी कपडे व दप्तर घेतले. सायंकाळी घरी गेल्यानंतर कामानिमित्त पाळधी येथे गेला होता. बुधवारी तो पुन्हा पुणे येथे जाणार होता, तत्पूर्वीच ही दुर्घटना घडली. दरम्यान, अनिल याच्या पश्चात आई, पत्नी कल्पना, दोन मुले,तीन भाऊ असा परिवार आहे. वडीलांचे निधन झाले आहे.