लग्नाचे आमिष दाखवून त्या युवतींचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:20 IST2021-09-12T04:20:05+5:302021-09-12T04:20:05+5:30
पहूर, ता. जामनेर : नाचनखेडा, ता. जामनेर येथील त्या त्रभन युवतींना लग्नाचे आमिष दाखवून अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार ...

लग्नाचे आमिष दाखवून त्या युवतींचे अपहरण
पहूर, ता. जामनेर : नाचनखेडा, ता. जामनेर येथील त्या त्रभन युवतींना लग्नाचे आमिष दाखवून अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार संबंधित युवतींच्या जबाबातून पोलीस चौकशीत निष्पन्न झाला आहे.
दौंड तालुक्यातून या युवतींना नातेवाइकांनी ताब्यात घेऊन पहूर पोलीस स्टेशन गाठले आहे. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाचखेडा, ता. जामनेर येथून तीन अल्पवयीन तरुणी गुरुवारी सकाळी घरी काही एक न सांगता बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. गुरुवार व शुक्रवारी नातेवाइकांनी या तरुणींचा शोध घेतला. पण त्या आढळून आल्या नाहीत. विशेष म्हणजे एकाच परिवारातील या तिघीही तरुणी सख्ख्या चुलत बहिणी आहेत. त्यामुळे परिसर हादरला व शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले होते. अखेर शुक्रवारी पहूर पोलिसात अज्ञात व्यक्तींविरुध्द संबंधित तरुणींच्या नातेवाइकांकडून अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लग्नाच्या आमिषातून अपहरण
नाचखेडा येथील काही तरुणांचे संबंधित तरुणींच्या घरी येणे जाणे होते. या ओळखीचा गैरफायदा घेऊन संबंधित तरुणांनी या तिन्ही मुलींना लग्नाचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला व तरुणींना घेऊन दौंड तालुक्यात गुरुवारी खासगी वाहनाने केडगाव गाठले. शोधादरम्यान नातेवाइकांना केडगाव येथे तरुणींना शोधण्यात यश आले. नातेवाइकांनी संबंधित तरुणींना ताब्यात घेऊन शनिवारी सकाळी पहूर पोलीस स्टेशन गाठले. संबंधित तरुणींनी दिलेल्या जबाबातून पोलीस चौकशीत ही माहिती समोर आली आहे. याप्रकरणी नाचखेडा येथील तीन संशयित तरुणांबरोबरच मदत करणाऱ्यांची नावे पोलिसांना देण्यात आली आहेत.
बालकल्याण समितीच्या जबाबानंतर पुढील कारवाई
संबंधित तिन्ही तरुणी या अल्पवयीन आहेत. त्यामुळे त्यांना जबाबासाठी बालकल्याण समितीसमोर आम्ही शनिवारी हजर केले. जबाब नोंदविल्यानंतर समिती त्यांच्या स्तरावरून आमच्याकडे त्यांचा जबाब अहवाल सादर करतील. त्यानंतर कारवाईची पुढील दिशा निश्चित होईल. तीन संशयितांची नावे मिळाली असून याबाबत शुक्रवारी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती तपास अधिकारी तथा पोलीस उपनिरीक्षक एस. पी. बनसोड यांनी सांगितले.