प्रशांत भदाणे -
जळगाव - केंद्र सरकार कायम म्हणतं की काश्मीर सुरक्षित आहे, पण पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीर सुरक्षित नाही, हे समोर आलं. हा हल्ला व्हायलाच नको होता. सरकारचं हे अपयश आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर टीका केलीय. ते शुक्रवारी रात्री एका लग्न सोहळ्यासाठी जळगावात आले होते. यावेळी माध्यमांशी बोलत होते. जयंत पाटलांनी यावेळी पहलगाम हल्ल्यावरून केंद्र सरकारला लक्ष्य केलं. ते पुढे म्हणाले की, पहलगाम मध्ये जी घटना घडली, ती व्हायलाच नको होती. आपण किती बेसावध होतो, याचं विश्लेषण केलं गेलं पाहिजे. ज्या ठिकाणी हल्ला झाला, त्या ठिकाणी संरक्षण का नव्हतं? हे पाहिलं पाहिजे. ज्यांनी हा हल्ला केला त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. या घटनेचा मास्टरमाईंड कोण आहे? हे ओळखण्याचे काम केंद्र सरकारच्या गुप्तचर यंत्रणांनी केलं पाहिजे, असंही ते म्हणाले.
दुश्मनाला त्याच्या घरात घुसून मारलं पाहिजे - जयंत पाटील पुढे म्हणाले, या घटनेचा मास्टरमाईंड हा पाकिस्तानचा असो वा कुठल्याही अन्य देशाचा असो. त्याच्या देशात घुसून त्याला मारलं पाहिजे. आपल्या देशाच्या तीनशे किलोमीटर आतमध्ये पण हल्ला होऊ शकतो, हे इंटेलिजन्सला कळायला पाहिजे होतं. इथपर्यंत माणसं येतात, हल्ला करतात आणि निघून जातात. हल्ला झाला हे समजू शकतो. मात्र, त्याला उत्तर द्यायला एकही जवान तिथे उपस्थित नव्हता. दीड तासापर्यंत त्या ठिकाणी मदत मिळाली नाही, असा काही लोकांचा आरोप आहे. हा प्रकार अत्यंत गंभीर आहे, असे त्यांनी सांगितले.
काश्मीर खरंच सुरक्षित आहे का? -केंद्रातील नेते कायम सांगतात की काश्मीर सुरक्षित आहे. मात्र, या घटनेमुळे काश्मीर सुरक्षित नाही हे आता समोर आले आहे. लोकांना सुरक्षितता वाटेल, असा प्रयत्न केंद्र सरकारने केला पाहिजे. हा हल्ला थोपवायला पाहिजे होता, अशी अपेक्षा होती. पण तिथे प्रतिउत्तर द्यायला कोणीच नव्हतं, हे सरकारचं अपयश आहे, अशी टीकाही त्यांनी शेवटी केली.