५५ अंगणवाड्यांमध्ये दहापेक्षा कमी बालकांची उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2020 15:51 IST2020-01-06T15:51:12+5:302020-01-06T15:51:18+5:30
आनंद सुरवाडे । जळगाव : जिल्हाभरातील ५५ अंगणवाड्यांमध्ये दहा किंवा त्यापेक्षा की बालके उपस्थित राहत असल्याचा प्रकार सीएस अहवालानुसार ...

५५ अंगणवाड्यांमध्ये दहापेक्षा कमी बालकांची उपस्थिती
आनंद सुरवाडे ।
जळगाव : जिल्हाभरातील ५५ अंगणवाड्यांमध्ये दहा किंवा त्यापेक्षा की बालके उपस्थित राहत असल्याचा प्रकार सीएस अहवालानुसार समोर आला असून या मुलांना पूर्व शालेय शिक्षण मिळत नसल्यामुळे आता या सर्व अंगणवाड्यांची तपासणी करून ३१ जानेवारीपर्यंत अहवाल पाठवावा, असे आदेश एकात्मिक बाल विकास योजना आयुक्तालयाकडून जि़ल्हा परिषदेला ला देण्यात आले आहे़
पोषण आहार अभियानाअंतर्गत निर्धारित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते़ या उपक्रमांपैकी रिअल टाईम मॉनिटरींग करण्यात येत असून कॉमन अॅप्लीकेश सॉफ्टवेअरद्वारे सर्व अंगणवाडी केंद्राची माहिती व त्या आधारे योजना सनियंत्रण करण्यात येत आहे़
नोव्हेंबर २०१९मध्ये सीएएस अहवालानुसार जळगाव जिल्ह्यातील ३ ते ६ वयोगटातील बालके अगदी कमी प्रमाणात अंगणवाड्यांमध्ये येत असल्याचे समोर आले आहे़ यात जिल्ह्यातील ८ अंगणवाड्यांमध्ये तर एकही बालक येत नसल्याचेही समोर आल्यामुळे याची चौकशी केली असता बालके केवळ आहार घेण्यासाठी येतात व निघून जातात, मात्र, पोषण अभियानाचा उद्देश केवळ आहार वाटप करणे नसून त्या मुलांना पूर्व शालेय शिक्षण मिळणेही आवश्यक असल्याचे पत्रात म्हटले आहे़ त्यामुळे लवकरच अंगणवाड्यांची इमारत, अंगणवाड्यांमधील तीन ते सहा वर्षाचा बालकांची उपस्थिती स्तनदा मातांची संख्या, अंगणवाडी किती अंतरावर आहे़ अंगणवाडी सुरू ठेवावी अथवा बंद करावी, या बाबींचा सुस्पष्ट अहवाल मागविण्यात आला आहे़
ज्या अंगणवाड्यांमध्ये कमी मुलांची संख्या आहे, अशा अंगणवाड्यातील मुलांना जवळच्या अंगणवाड्यांमध्ये सामावून घेतले जाईल व येथील कर्मचाऱ्यांचे रिक्त जागांवर समायोजन करण्यात येईल, मात्र, हे सर्व काही सर्व्हेक्षणानंतरच ठरणार आहे, असे सांगण्यात
आले़
अंगणवाड्यांत बालक नाही
पोषण अभियानाच्या आयुक्तांच्या पत्राला अंगणवाड्यांची यादी जोडण्यात आली असून यात जवखेडा ता़ अमळनेर, पिंपळवाड ता़ चाळीसगाव, खरई ता़ चाळीसगाव, मोरचिडा ता़ चोपडा, गाड्या ता़ यावल, जामन्या ता़ यावल, उसमळी ता़ यावल, लंगडाआंबा ता़ यावल या ठिकाणी अंगणवाड्यांमध्ये एकही बालक उपस्थित नसल्याचे म्हटले आहे तर यात ५५ अंगणवाड्यांची यादी देण्यात आली आहे़
अंगणवाडी सेविकांना मोबाईल दिले आहेत़ ज्या सेविकांचे मोबाईल नादूरस्त आहेत, चोरीला गेलेले आहेत अशा ठिकाणची आकडे शून्य येत आहे़ मुळात मुले असतात मात्र तांत्रिक बाबीमुळे ही आकडेवारी शून्य दिसते़ सर्व अंगणवाड्यांची तपासणी करून अहवाल देणार आहोत़
-आऱ आऱ तडवी, महिला व बालविकास आधिकारी, जि़ प़