काम मिळण्यापूर्वीच काळाची झडप, ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By विजय.सैतवाल | Updated: December 17, 2023 23:50 IST2023-12-17T23:50:10+5:302023-12-17T23:50:36+5:30
एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

काम मिळण्यापूर्वीच काळाची झडप, ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
विजयकुमार सैतवाल, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: कामाच्या शोधासाठी जळगावात आलेले मुकेश उदलसिंग चव्हाण (रा. खारी, जि. बऱ्हाणपूर) हे दुचाकीवर जात असताना भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने ते जागीच ठार झाले तर त्यांचा पुतण्या तुषार रमेश पवार (१८, रा. कुसुंबा) हा जखमी झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुकेश चव्हाण हे जळगाव येथे कामाच्या शोधासाठी आले होते. यासाठी ते कुसुंबा येथे त्यांचे मामे भाऊ रमेश पवार यांच्या घरी राहत होते. शनिवारी रात्री ते तुषार पवारसह दुचाकीने जळगावकडेस येत असताना भरधाव ट्रकने (क्र. एमएच १५, सीके २२३०) धडक दिली. यात चव्हाण जागीच ठार झाले. या अपघातात दुचाकीचालक तुषार पवार यालाही मार लागला आहे.
या प्रकरणी तुषारने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेंद्रसिंग पाटील करीत आहेत.