नगरपरिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जलकुंभ कोसळण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:16 IST2021-07-28T04:16:33+5:302021-07-28T04:16:33+5:30
वरणगाव, ता . भुसावळ : येथे नवीन पाणी पुरवठा योजनेअंतर्गत विकास कॉलनीतील पूर्वीपासूनच्या जलकुंभाशेजारीच नवीन जलकुंभासाठी ठेकेदाराने ...

नगरपरिषद प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे जलकुंभ कोसळण्याच्या मार्गावर
वरणगाव, ता . भुसावळ : येथे नवीन पाणी पुरवठा योजनेअंतर्गत विकास कॉलनीतील पूर्वीपासूनच्या जलकुंभाशेजारीच नवीन जलकुंभासाठी ठेकेदाराने गेल्या तीन आठवड्यांपासून खोदकाम करून ठेवले आहे. त्यामुळे पावसाचे पाणी त्या ठिकाणी झिरपत आहे. या खोदकामामुळे जुन्या जलकुंभाचे पिलर उघडे पडले असून, झिरपणाऱ्या पाण्यामुळे भर वस्तीमधील हा जलकुंभ क्षणात कोसळून फार मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. दुसरी टाकी बांधणाऱ्या ठेकेदाराच्या या दुर्लक्षाबाबत पालिका अधिकाऱ्यांनी विचार करून नागरिकांच्या सुरक्षेचे गांभीर्य लक्षात घ्यावे, अशी मागणी विकास कॉलनीतून होत आहे .
वरणगाव येथे नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर होऊन ठेकेदाराकडून कार्याला सुरुवात करण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याचा सर्व नागरिकांना उपयोग व्हावा या दृष्टीने पालिका स्तरावरून नियोजन करण्यात आले आहे. त्या अंतर्गत प्रभाग क्रमांक .. मधील वरणगाव फॅक्टरीजवळील पवन नगरमध्ये पिण्याचे पाणी पोहोचावे याकरिता येथील प्रभाग क्रमांक ३ मधील विकास कॉलनीत जुन्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत बांधकाम करण्यात आलेल्या एक लाख लिटर पाण्याच्या जलकुंभाशेजारी नवीन योजनेतील दोन लाख लिटरचा जलकुंभ बांधकाम करण्याचे नियोजन केले असून, कामाला सुरुवात झाली आहे. जुन्या जलकुंभाशेजारी अगदी फाउंडेशन उघडे पाडून खोदकाम करून ठेवलेले आहे. संततधार प्रवाहाचे पाणी त्या खड्डयात मुरत असून, जलकुंभ कोणत्या क्षणी कोसळेल हे सांगता येत नाही. हा जलकुंभ दाट वस्तीत व रस्त्याला लागून आहे. यामुळे मोठी दुर्घटना होण्याचीदेखील शक्यता आहे.
जुन्या जलकुंभाशेजारी खोदलेला खड्डा व पाण्याच्या टाकीचे उघडे पडलेले पिलर. (बाळू चव्हाण)