Jalgoan Nagar Panchayat Election Result: एकनाथ खडसेंना धक्का, शिवसेनेने गड जिंकला; ‘ईश्वर चिठ्ठी’नं भाजपाची लाज राखली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2022 01:16 PM2022-01-19T13:16:42+5:302022-01-19T16:12:57+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यासाठी हा निकाल अत्यंत धक्कादायक मानला जात आहे.

Jalgoan Nagar Panchayat Election Result: Shiv Sena has majority in Jalgoan Bodwad Nagar Panchayat, Setback to Eknath Khadse, BJP Win 1 Seat | Jalgoan Nagar Panchayat Election Result: एकनाथ खडसेंना धक्का, शिवसेनेने गड जिंकला; ‘ईश्वर चिठ्ठी’नं भाजपाची लाज राखली

Jalgoan Nagar Panchayat Election Result: एकनाथ खडसेंना धक्का, शिवसेनेने गड जिंकला; ‘ईश्वर चिठ्ठी’नं भाजपाची लाज राखली

Next

जळगाव – राज्यात नगर पंचायतीचे निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीविरुद्ध भाजपा अशी थेट लढत नगर पंचायतीच्या निवडणुकीत पाहायला मिळाली होती. त्यात आता निकालांमध्ये भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्यात चुरस दिसून येत आहे. काही ठिकाणी उमेदवारांना समसमान मते मिळाल्याने ईश्वर चिठ्ठी काढावी लागली. त्यामुळे जनतेची मतं मिळाली परंतु ईश्वर चिठ्ठीनं हिरावून नेलं अशी चर्चा सगळीकडे सुरु आहे.

अत्यंत चुरशीच्या झालेल्या बोदवड नगरपंचायतीच्या निकालात शिवसेनेने मुसंडी मारली आहे. 9 जागांवर विजय मिळवत शिवसेनेने बोदवड नगरपंचायत ताब्यात घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना हा आपल्याच होमपीचवर जबर धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला 7 जागा आल्या. तर भाजपला तर अवघी 1 जागा मिळवता आली. ईश्वर चिठ्ठीने ही जागा भाजपकडे आली. त्याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला.

आज सकाळी मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली तेव्हा, राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली होती. मात्र, त्यानंतर शिवसेनेने जोरदार मुसंडी मारत 17 पैकी 9 जागांवर विजय मिळवला. आता बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा नगराध्यक्ष विराजमान होणार आहे. ही निवडणूक दोन टप्प्यात पार पडली. पहिल्या टप्प्यात 13 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यानंतर 4 जागांसाठी दुसरा टप्पा पार पडला. दोन्ही टप्प्यात सर्वपक्षीय 68 उमेदवार रिंगणात होते. यावेळी काही प्रभागात धक्कादायक निकाल समोर आले. प्रभाग क्रमांक 10 मध्ये एकनाथ खडसे यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे कैलास चौधरी यांच्या पत्नी रेखा चौधरी यांचा पराभव झाला. सलग 25 वर्षे प्रतिनिधित्व करणाऱ्या चौधरींचा या ठिकाणी पराभव झाला. त्या ठिकाणी सेनेच्या मंजुषा बडगुजर विजयी झाल्या.

आमदार चंद्रकांत पाटील ठरले किंगमेकर!

शिवसेनेचे स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील हे या निवडणुकीत किंगमेकर ठरले आहेत. बोदवड नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाली, तेव्हापासून एकनाथ खडसे आणि चंद्रकांत पाटलांमध्ये जोरदार वाद रंगला होता. दोन्ही नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत होते. त्यामुळे बोदवड नगरपंचायतीवर कोणाची सत्ता येणार? याची प्रचंड उत्सुकता होती. अखेर या ठिकाणी शिवसेनेने बाजी मारत राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवले आहे.

खडसेंना होमपीचवर जबर धक्का-

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यासाठी हा निकाल अत्यंत धक्कादायक मानला जात आहे. भाजप सोडल्यानंतर खडसेंनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेली ही सर्वात मोठी आणि प्रतिष्ठेची निवडणूक होती. एकनाथ खडसे यांनी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात सलग 40 वर्षे प्रतिनिधित्व केलं आहे. त्यामुळे खडसेंच्या दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. पण त्यात त्यांना अपयश आले आहे.

भाजपासाठी चिंतेचा निकाल

बोदवड नगरपंचायतीचा निकाल समोर आल्यानंतर भाजपच्या वाट्याला अवघी एक जागा आली आहे. ईश्वर चिठ्ठीच्या मदतीने भाजपला ही जागा मिळाली. त्यामुळे भाजपच्या दृष्टीने हा निकाल चिंता वाढवणारा आहे. भाजपनेते गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाचीही या निवडणुकीत कसोटी होती. त्यामुळे गिरीश महाजन याठिकाणी सपशेल अपयशी ठरल्याचे दिसत आहे.

Web Title: Jalgoan Nagar Panchayat Election Result: Shiv Sena has majority in Jalgoan Bodwad Nagar Panchayat, Setback to Eknath Khadse, BJP Win 1 Seat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.