जळगाव मनपा निवडणूक : प्रचार शिगेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 12:39 IST2018-07-30T12:37:40+5:302018-07-30T12:39:02+5:30
प्रचार ‘तोफा’ आज थंडावणार

जळगाव मनपा निवडणूक : प्रचार शिगेला
जळगाव : मनपा निवडणुकीसाठी प्रचारास आता अवघे काही तास शिल्लक असल्याने रविवारी प्रचार शिगेला पोहचला. रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने राजकीय पक्षांनी दिवसभर जोरदार प्रचार केला व सायंकाळी शहराच्या अनेक भागात ठिकठिकाणी सभा झाल्या, त्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या.
शिवसेनेकडून माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी सकाळी ९ वाजेपासून प्रचाराला सुरुवात केली. प्रचार रॅली घेत मतदारांच्या प्रत्यक्ष भेटी घेतल्या. तसेच आमदार निलम गोºहे यांनीही महिलांशी संवाद साधला. संपर्क प्रमुख संजय सावंत यांनीही काही भागांमध्ये स्वतंत्र प्रचार केला. तर सायंकाळी सुरेशदादा जैन, पशुसंवर्धन मंत्री अर्जुन खोतकर, सहकार राज्य मंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी जाहीर सभा घेत मैदान गाजवले.
तर भाजपाकडून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी देखील प्रचार रॅली, सभा घेतल्या. राष्टÑवादी कॉँग्रेसतर्फे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी प्रचार केला.काँग्रेसतर्फे रविवारी बिलाल चौक, तांबापुरा येथे आमदार आसिफ शेख यांची सभा झाली.
मुख्यमंत्र्यांचा दौरा अनिश्चित
मनपा निवडणुकीनिमित्त भाजपाच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचे नियोजन २९ रोजी पक्षाने केले असताना त्यांचा दौरा हा रद्द झाला. दरम्यान ३० रोजी ते येतील की नाही, हे सुद्धा अनिश्चित आहे. २९ रोजी शहरातील सागर पार्क मैदानावर मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाजातर्फे राज्यभर आंदोलने सुरु आहेत. जळगावातील मराठा क्रांती मोर्चानेही मुख्यमंत्र्यांची सभा गनिमी काव्याने उधळून लावू असा इशारा दिल्याने २९ रोजी सभा झाली नाही.
सायंकाळी ५.३० वाजता प्रचार थांबणार
सोमवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असून , सायंकाळी ५.३० वाजता प्रचारतोफा थंडावणार आहेत. त्यामुळे सकाळी सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अपक्ष उमेदवारांकडून देखील शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. मोटारसायकल रॅली, प्रचार सभा व मोठ्या प्रचार रॅलीवर उमेदवारांचा भर राहणार आहे. त्यानंतर मात्र, छुप्या व प्रत्यक्ष मतदारांच्या भेटींवर उमेदवारांचा भर राहण्याची शक्यता आहे.