सोसाट्याचा वारा... ३५ ते ४० किमी वेगाच्या वादळाने उडविली जळगावकरांची धांदल
By विलास.बारी | Updated: April 20, 2023 20:55 IST2023-04-20T20:54:31+5:302023-04-20T20:55:00+5:30
हलक्या सरींमुळे वातावरणात गारवा : दुपारी कडाक्याचे उन, सायंकाळी वादळी पाऊस

सोसाट्याचा वारा... ३५ ते ४० किमी वेगाच्या वादळाने उडविली जळगावकरांची धांदल
विलास बारी
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून कडक्याच्या उन्हामुळे त्रस्त असलेल्या जळगावकरांना गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता वादळी पावसाचा सामना करावा लागला. दुपारी पारा ४१ अंशावर पोहचला असताना, सायंकाळी ५.३० वाजता मात्र वातावरणात बदल होवून, शहरात ३५ ते ४० किमी वेगाने वाहणाऱ्या वादळाने जळगावकरांची धांदल उडाली. त्यात वादळासह शहरातील अर्ध्या भागात पावसाचा शिडकाव झाला. अचानक वादळाने तडाखा दिल्याने बाजारपेठ विस्कळीत झाली होती.
गुरुवारी सकाळी जळगाव शहरातील अर्ध्या भागात ढगांच्या गडागडाटात अवकाळी पावसाने हजेरी दिली. त्यानंतर पुन्हा सकाळी ११ वाजेपासून जळगावच्या कमाल तापमानाचा पारा ४१.९ अंशावर कायम होता. दुपारी चार ते साडेचार वाजता अचानक वातावरण बदल झाला. आकाशात ढगांची गर्दी झाली. ढगाळ वातावरणात देखील उष्ण वारे कायम असल्याने असह्य उकाडा होता. थोड्याच वेळात वादळी वाऱ्यांनी संपूर्ण जळगाव शहराला तडाखा दिला. अचानक आलेल्या वादळामुळे बाजारपेठ विस्कळीत झाली. अनेक भागातील रस्त्यावरील फलकांची देखील मोडतोड झाली. दरम्यान, हलक्या सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.
ममुराबादमध्ये वीज कोसळून गोऱ्हा ठार
सायंकाळी जळगाव शहरासह जळगाव तालुक्यात देखील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. ढगांच्या गडगडाट व वीजांच्या कडकडाटानंतर ममुराबाद येथील शेतकरी अशोक नागो पाटील हे शेतातून आपल्या बैलगाडे घेवून घरी निघाले असताना, गावातील मनुदेवी मंदिराजवळ वीज कोसळल्याने गोऱ्हा ठार झाला. सुदैवाने सालदार व बैलजोडीला कोणतीही दुखापत झाली नाही.