कार अपघातात जळगावचा तरूण ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 22:46 IST2018-06-15T22:46:30+5:302018-06-15T22:46:30+5:30
पारोळा तालुक्यातील मोंढाळे गावानजीक महामार्गवर १४ जूनच्या रात्री १२़३० वाजता झालेल्या कारच्या अपघातात शहरातील इंद्रप्रस्थ नगरात वास्तव्यास असलेल्या अनिल प्रभाकर सोनवणे (वय २७) याचा जागीच मृत्यू झाला़

कार अपघातात जळगावचा तरूण ठार
जळगाव- पारोळा तालुक्यातील मोंढाळे गावानजीक महामार्गवर १४ जूनच्या रात्री १२़३० वाजता झालेल्या कारच्या अपघातात शहरातील इंद्रप्रस्थ नगरात वास्तव्यास असलेल्या अनिल प्रभाकर सोनवणे (वय २७) याचा जागीच मृत्यू झाला़ दरम्यान, या अपघातात कल्पेश मनोहर कापडणे (वय २० रा. ईश्वर कॉलनी), शुभम लोहार (वय २६ रा. सिंधी कॉलनी) हे दोघेही जखमी झाले. त्यांच्यावर धुळे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
शहर पोलिस स्टेशनच्या मागील बाजुस असलेल्या मार्केटमधील एका दुकानात इंद्रप्रस्थ नगरातील अनिल सोनवणे, कल्पेश कापडणे, शुभम लोहार हे तिघे मालकाच्या मुलाला व दुकानातील माल घेण्यासाठी सुरत येथे जाण्यासाठी एमएच़१९़ ०६०९ या क्रमांकाच्या कारने रात्री १०.३० वाजता जळगावातून निघाले. पारोळा तालुक्यातील मोंढाळा गावापासून काही अंतरावर असलेल्या एच.पी.पेट्रोल पंपाजवळ समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने रात्री १२.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या कारला समोरून जोरदार धडक दिली. या अपघातात कारचालक अनिल सोनवणे याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर जखमी शुभम लोहार व कल्पेश कापडणे या दोघांना तात्काळ १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने धुळे येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.