Jalgaon: लग्नाहून येताना दुचाकी घसरली, युवक मृत्युमुखी, एक जण जखमी
By विजय.सैतवाल | Updated: January 3, 2024 19:21 IST2024-01-03T19:18:36+5:302024-01-03T19:21:54+5:30
Jalgaon: लग्नाहून परतत असताना दुचाकी घसरून ती दुभाजकावर आदळली व तेथे असलेल्या पत्र्याने मानेची नस कापली जाऊन चेतन दीपक वराडे (१६, रा. विटनेर, ता. जळगाव) हा युवक जागीच ठार झाला.

Jalgaon: लग्नाहून येताना दुचाकी घसरली, युवक मृत्युमुखी, एक जण जखमी
- विजयकुमार सैतवाल
जळगाव - लग्नाहून परतत असताना दुचाकी घसरून ती दुभाजकावर आदळली व तेथे असलेल्या पत्र्याने मानेची नस कापली जाऊन चेतन दीपक वराडे (१६, रा. विटनेर, ता. जळगाव) हा युवक जागीच ठार झाला. दुचाकीस्वार पुष्पल राजाराम गायकवाड (२०, रा. विटनेर, ता. जळगाव) हा तरुण जखमी झाला. हा अपघात बुधवार, ३ जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता जळके गावाजवळ झाला.
विटनेर येथील रहिवासी असलेला चेतन वराडे हा युवक इयत्ता दहावीला असून, तो व पुष्पल गायकवाड हे दोघे जण बुधवारी दुचाकीने लग्नाला गेले होते. लग्नाहून परतत असताना वावडदे ते विटनेरदरम्यान जळके गावाजवळ दुचाकी घसरली. त्यानंतर ती दुभाजकावर आदळली व दुभाजकावरील पत्र्याने चेतनच्या मानेची नस कापली गेली. यासोबतच पुष्पल यालाही मार लागला. अपघातानंतर मयत व जखमीला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व मित्रांनी रुग्णालयात धाव घेतली.
गरीब कुटुंबातील होतकरू मुलगा
मयत चेतनचे आई-वडील मजुरी काम करून आपला उदरनिर्वाह करतात, तर त्याचा मोठा भाऊदेखील आई-वडिलांना कामात मदत करतो. चेतन शिक्षण घेत होता. अधून-मधून तोदेखील काम करून कुटुंबाला हातभार लावत होता. होतकरू मुलाच्या अचानक जाण्याने गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली.