जळगाव येथे वाहतूक पोलिसांनी आकाशवाणी चौकात कारमध्ये ३० लाखाची रोकड पकडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 22:50 IST2018-03-22T22:50:02+5:302018-03-22T22:50:02+5:30
आकाशवाणी चौकात गुरुवारी सायंकाळी पाच वाजता नियमाचे उल्लंघन केलेल्या कारला वाहतूक पोलिसांनी अडविले असता त्या कारमध्ये मागील सीटवर गोण्यांमध्ये ३० लाख रुपयांची रोकड आढळून आली.

जळगाव येथे वाहतूक पोलिसांनी आकाशवाणी चौकात कारमध्ये ३० लाखाची रोकड पकडली
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि, २२: आकाशवाणी चौकात गुरुवारी सायंकाळी पाच वाजता नियमाचे उल्लंघन केलेल्या कारला वाहतूक पोलिसांनी अडविले असता त्या कारमध्ये मागील सीटवर गोण्यांमध्ये ३० लाख रुपयांची रोकड आढळून आली. इतक्या मोठ्या प्रमाणात रोख रक्कम व त्याबाबत कोणतेही कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी कारसह रोकड व त्यातील तिघांना शहर वाहतूक शाखा व तेथून जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला नेण्यात आले. चौकशीअंती ही रक्कम नियमात असल्याचे स्पष्ट झाले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, आकाशवाणी चौकात गुरुवारी शहर वाहतूक शाखेचे पंडित वानखेडे, नितीन ठाकूर व शैलेंद्र बाविस्कर या तिघांची ड्युटी होती. सायंकाळी पाच वाजता पाळधीकडून आलेल्या कारने (क्र.एम.एच.०२ बी.जी.६६७४) सिग्नल नियमाचे उल्लंघन केले. त्यामुळे ड्युटीवरील तिन्ही पोलिसांनी कार थांबवून चालकाकडे वाहन परवान्याची चौकशी केली असता त्याच वेळी मागे एक जण बसलेला होता तर पांढºया गोण्यांमध्ये काही वस्तू भरलेल्या होत्या. पोलिसांनी त्याबाबत चौकशी केली असता त्यात ३० लाख रुपये असल्याचे कारमधील दोघांनी सांगितले. मात्र कोणतेच कागदपत्रे नसल्याने संशयावरुन पोलिसांनी कार शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात आणली.
चौकशीत रक्कम निघाली अधिकृत
वाहतूक शाखेच उपनिरीक्षक फडतरे यांनी रकमेबाबत चौकशी केली असता ही रक्कम ग्रामीण कोटा फायनान्स प्रा.लि.बंगळुरु यांच्या मालकीची असल्याचे निष्पन्न झाले. कारमध्ये विभागीय व्यवस्थापक मगबुल पाशा व अमळनेर शाखेचे व्यवस्थापक संतोष पवार होते. अमळनेर येथून बोदवड येथे ही रक्कम नेण्यात येत होती. अमळनेर येथून कागदपत्रे मागविल्यावर रक्कम अधिकृत असल्याचे स्पष्ट झाले. जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अपर पोलीस अधीक्षक बच्चन सिंह व उपअधीक्षक सचिन सांगळे यांनीही या प्रकरणाची चौकशी केली. स्टेशन डायरीला नोंद घेऊन कार सोडण्यात आली. इतकी मोठी रक्कम नेतांना सुरक्षिततेच्या बाबतील खबरदारी घेतली नसल्याने पोलिसांनी व्यवस्थापकांना खडसावले.