जळगावात विनाक्रमांकाची वाळूची वाहने होणार जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2018 15:48 IST2018-09-25T15:46:34+5:302018-09-25T15:48:14+5:30
विनाक्रमांकाच्या वाहनांद्वारे वाळू वाहतूक करण्याचे प्रकार वाढले असून अशा वाहनांच्या मालकांनी तातडीने नंबर घ्यावेत, अन्यथा ही वाहने जप्त करून लिलाव करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी सोमवार, २४ रोजी आयोजित जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीत दिला.

जळगावात विनाक्रमांकाची वाळूची वाहने होणार जप्त
जळगाव : विनाक्रमांकाच्या वाहनांद्वारे वाळू वाहतूक करण्याचे प्रकार वाढले असून अशा वाहनांच्या मालकांनी तातडीने नंबर घ्यावेत, अन्यथा ही वाहने जप्त करून लिलाव करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी सोमवार, २४ रोजी आयोजित जिल्हा दक्षता समितीच्या बैठकीत दिला. त्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
या बैठकीला अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडिलकर, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात वाळूचा अवैध उपसा सर्रास सुरू असून ही वाहने पकडल्यानंतरही दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी पकडलेली वाहने पळवून नेण्याच्या प्रकारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नुकताच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून दोन डंपर पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. तसेच विनाक्रमांकाची वाहने वाळू वाहतुकीसाठी वापरली जातात. त्यामुळे ओळख पटविणेही कठीण होते. यापुढे अशी वाहने आढळल्यास ती जप्त करून त्यांचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी महसूल, आरटीओ व पोलीस विभागातर्फे संयुक्त मोहीम राबविण्याचे ठरले.
मालमत्तांवर दंडाच्या रकमेचा बोजा चढविणार
अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन पकडून ते दंडात्मक कारवाईसाठी जप्त करून जिल्हाधिकारी अथवा तहसील कार्यालयात ठेवल्यास ते पळवून नेण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे यापुढे अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन आढळल्यास त्यावर थेट गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. जेणेकरून त्यानंतर कोर्टातून संबंधित वाहनचालकास दंडही होईल. तसेच यापूर्वी जप्त केलेल्या वाहनांवरील दंड संबंधित मालकांनी भरणे टाळल्याने ती वाहने अनेक महिन्यांपासून पडून आहेत. अशा वाहनांचा लिलाव करण्याचा तसेच वाहन मालकांचा शोध लागल्यास त्यांच्या मालमत्तेवर दंडाच्या रकमेचा बोजा चढविण्याचा निर्णय घेण्यात आला.