२ वर्षांचा परफॉर्मन्स... राज्यात शालेय शिक्षणात जळगाव सातव्या क्रमांकावर
By अमित महाबळ | Updated: July 11, 2023 17:59 IST2023-07-11T17:58:20+5:302023-07-11T17:59:32+5:30
शालेय शैक्षणिक व्यवस्थेची कामगिरीनिहाय वर्गवारी करणाऱ्या निर्देशांकाचा, २०२०-२१ आणि २०२१-२२ या वर्षाचा एकत्रित अहवाल जारी करण्यात आला आहे.

२ वर्षांचा परफॉर्मन्स... राज्यात शालेय शिक्षणात जळगाव सातव्या क्रमांकावर
अमित महाबळ
जळगाव : केंद्रीय शिक्षण मंत्रालय, शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने देशातील प्रत्येक राज्यातील जिल्ह्यांचा गेल्या दोन वर्षांचा परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स (पीजीआय-डी) जाहीर केला असून, त्यात महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांचा लेखाजोखा मांडला आहे. २०२१-२२ मध्ये चार जिल्हे अतिउत्तम श्रेणीत, तर उत्तम श्रेणीतील ३२ जिल्ह्यांमध्ये जळगाव सातव्या क्रमांकावर आले आहे. आधीच्या तुलनेत जिल्ह्याला मिळालेल्या गुणांकनात सुधारणा झाली आहे.
शालेय शैक्षणिक व्यवस्थेची कामगिरीनिहाय वर्गवारी करणाऱ्या निर्देशांकाचा, २०२०-२१ आणि २०२१-२२ या वर्षाचा एकत्रित अहवाल जारी करण्यात आला आहे. या अहवालात जिल्हा स्तरावरील शालेय शिक्षण व्यवस्थेच्या सर्वंकष विश्लेषणासाठी निर्देशांक तयार करून या शिक्षण व्यवस्थेच्या कामगिरीचे मूल्यांकन केले जाते. निर्देशांकानुसार मिळालेले गुणांकन हे जिल्ह्याने कुठल्या बाबतीत सुधारणा करणे आवश्यक आहे ते दर्शविते. या अहवालानुसार २०२०-२१ मध्ये उत्तम श्रेणीत १८ व्या क्रमांकावर असलेल्या जळगाव जिल्ह्याने २०२१-२२ या वर्षात गुणांकनात सुधारणा करीत सातव्या क्रमांकावर झेप घेतली आहे.
मूल्यांकनाची अशी होती विभागणी
अहवालासाठी मूल्यांकन करताना ८३ निर्देशक ठरविण्यात आले होते. त्यांचे एकूण मूल्यमापन ६०० गुणांमध्ये केले आहे. या ८३ निर्देशकांची मिळालेले एकूण परिणाम, वर्गातून केल्या जाणाऱ्या अध्यापनाची परिणामकारकता, पायाभूत सुविधा आणि विद्यार्थ्यांचे हक्क, शाळा सुरक्षा आणि बाल संरक्षण, डिजिटल अध्ययन आणि प्रशासन प्रक्रिया या सहा गटांमध्ये विभागणी केली आहे.
शाळांमध्ये १६ कलमी कार्यक्रमामुळे भौतिक सुधारणा झाली, निपुणच्या चार चाचण्यांमुळे शैक्षणिक गुणवत्तेत वाढ झाली. जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्तावाढीला चालना मिळाली. यापुढे अजून गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करण्याचे उद्दिष्ट आहे. आजचे यश हे सामूहिक असल्याचे जि. प. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विकास पाटील यांनी म्हटले आहे.
२०२१-२२ मधील ग्रेडनिहाय क्रमश: स्थिती
जिल्हे : ३६
अति उत्तम : ०४ (सातारा, मुंबई २, कोल्हापूर, नाशिक)
उत्तम : ३२ (सोलापूर, मुंबई उपनगर, संभाजीनगर, रत्नागिरी, सांगली, सिंधुदुर्ग, जळगाव, बीड, पुणे, अहमदनगर, ठाणे, नंदुरबार, रायगड, नांदेड, वाशिम, अमरावती, पालघर, उस्मानाबाद, चंद्रपूर, गोंदिया, धुळे, परभणी, वर्धा, अकोला, भंडारा, जालना, लातूर, यवतमाळ, हिंगोली, बुलढाणा, नागपूर, गडचिरोली.)
जळगावची स्थिती
कोणत्या गटात : उत्तम
कितवा क्रमांक : ०७
जळगाव जिल्ह्याचे गुणांकन
२०१८-२०१९ : ३१४
२०१९- २०२० : ३७१
२०२० - २०२१ : ४०२
२०२१ - २०२२ : ४०८
जळगाव जिल्ह्याची श्रेणी
२०१८-२०१९ : प्रचेष्ट १
२०१९- २०२० : उत्तम
२०२० - २०२१ : उत्तम
२०२१ - २०२२ : उत्तम