Jalgaon ranks fourth in the state in the number of deaths | बाधितांच्या मृत्यूमध्ये राज्यात जळगाव चौथ्या क्रमांकावर

बाधितांच्या मृत्यूमध्ये राज्यात जळगाव चौथ्या क्रमांकावर

आनंद सुरवाडे।
जळगाव : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दररोज वाढतच असून या सोबतच रोज किमान चार बाधितांचे मृत्यूही होत आहेत. त्यामुळे वाढत जाणारी मृत्यूची संख्या दिवसेंदिवस चिंताजनक होत असून राज्यात बाधितांच्या मृत्यूसंख्येत जळगाव जिल्हा चौथ्या क्रमांकावर आला आहे़ मृत्यूदराची तुलना केल्यास जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. जिल्ह्यात मृतांची संख्या ९४वर पोहचली असून मुंबई, पुणे, ठाणे या नंतर थेट जळगावचा क्रमांक लागत आहे.
जळगावचा मृत्यूदर हा देशाच्या मृत्यदरापेक्षा चौपट असल्याचे चित्र असताना असा मृत्यूदर काढला जात नाही, असा दावाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाकडून करण्यात येत आहे़ आता तपासण्या वाढल्यानंतर बाधितांची संख्या झपाट्याने वाढली त्यात मृत्यूदर आपोआप कमी होत असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे़ अनेक रुग्ण हे विविध व्याधी असलेले होते़ त्यांना रुग्णालयात आणण्यास उशीर झाला, प्राथमिक स्तरावर निदान होणे अत्यावश्यक आहे़ रुग्ण वेळेवर डॉक्टरकडे आल्यास डॉक्टरलाही उपचार करून त्याचे प्राण वाचविता येतात, असा सूर वैद्यकीय महाविद्यलयातून उमटत आहे़ दुसरीकडे प्राथमिक स्तरावर रुग्णांची तपासणी होणे आवश्यक असल्याचा मुद्दा समोर आला आहे़ ज्या भागात रुग्ण आढळला आहे, केवळ त्याच भागात व स्वत:हून येणारे रुग्ण अशीच सध्या तपासणीची प्रक्रिया सुरू आहे़ ज्यांना अधिक धोका त्यांची तपासणी करून त्यांना सुरक्षित ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे असून ही मोहीम हाती घेणे गरजेचे असल्याचा सूरही उमटत आहे़

मोठ्या महापालिकांध्ये कमी मृत्यू
कल्याण डोंबिवली, नागपूर, नाशिक, औरंगाबाद, नवी मुंबई अशा मोठ्या महानगरांपेक्षा जळगावात मृत्यूची संख्या अधिक आहे़ त्यामानाने काही मोठ्या महानगरांमध्ये रुग्णांसंख्या ही अधिक असताना मृत्यू मात्र कमी आहेत़ त्यामानाने जळगावात होणारे मृत्यू हे अधिकच चिंताजनक आहेत़

रुग्णसंख्येत मालेगाव, नागपूरला टाकले मागे...
जिल्हाभरात रुग्णसंख्या अत्यंत झपाट्याने वाढत आहे़ गेल्या चारच दिवसात तब्बल २२८नवीन रुग्ण जिल्हाभरात आढळून आले आहेत़ यात चाचण्या वाढविण्यात आल्याने रुग्णसंख्या वाढत असून आधिच या बाधितांना क्वारंटाईन करण्यात आल्याने पुढील धोका टळल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येत आहे़ दुसरीकडे जळगावची रुग्ण संख्या ७५० पार गेल्याने जळगावने अगदी काहीच दिवसात नागपूर व मालेगाव या ‘हॉटस्पॉट सिटी’ला मागे टाकले आहे़ मालेगावात सद्यस्थितीत ७४८ रुग्ण असून तेथे ५८ मृत्यू आहेत तर नागपूरमध्ये ५७४ रुग्ण असून तेथे १० मृत्यू झाले आहेत.

अनेक रुग्ण मृतावस्थेत आली, अनेकांना विविध व्याधी होत्या़ अनेक लोक अगदीच गंभीरावस्थेत दाखल झाले़ अशा स्थितीत कितीही सुविधा असल्या तरी डॉक्टरांच्या हाती काही नसते़ केवळ डॉक्टरांना दोष देणे चुकीचे आहे़ प्राथमिक स्तरावर निदान होणे आवश्यक आहे़ रुग्णांनी लवकर रुग्णालयात येणे गरजेचे आहे़ उपाययोजना आधीपासून सुरूच आहे़
- डॉ़ भास्कर खैरे, अधिष्ठाता

Web Title: Jalgaon ranks fourth in the state in the number of deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.