Jalgaon: चोरीच्या दुचाकी विकण्याचा डाव पोलिसांनी उधळला, टोळीत अल्पववयीन मुलाचाही समावेश
By विजय.सैतवाल | Updated: October 18, 2023 17:22 IST2023-10-18T17:21:46+5:302023-10-18T17:22:40+5:30
Jalgaon Crime News: जळगावसह छत्रपती संभाजी नगर, नाशिक, बीड जिल्ह्यातून दुचाकींची चोरी करणाऱ्या टोळीचा एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश करीत चोरीच्या दुचाकी विक्री करण्याचा डाव उधळून लावला.

Jalgaon: चोरीच्या दुचाकी विकण्याचा डाव पोलिसांनी उधळला, टोळीत अल्पववयीन मुलाचाही समावेश
- विजयकुमार सैतवाल
जळगाव - जळगावसह छत्रपती संभाजी नगर, नाशिक, बीड जिल्ह्यातून दुचाकींची चोरी करणाऱ्या टोळीचा एमआयडीसी पोलिसांनी पर्दाफाश करीत चोरीच्या दुचाकी विक्री करण्याचा डाव उधळून लावला. या कारवाईत अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून इतर तीन संशयितांना अटक करण्यात आले आहे. चोरीच्या नऊ दुचाकीदेखील हस्तगत केल्या आहे.
एमआयडीसीतील राम दालमिलच्या गेटसमोरून भूषण दिलीप पाटील (रा. जुने जळगाव) यांची दुचाकी (क्र. एमएच १९, डीवाय ८४९०) २९ जुलै रोजी चोरीला गेली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना मेहरुण परिसरातील काही तरुण बाहेरगावाहून चोरुन आणलेल्या महागड्या दुचाकी विक्री करण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. गुन्हे शोध पथकातील पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पोहेकॉ गणेश शिरसाळे, योगेश बारी, किशोर पाटील, सचिन पाटील, पोकॉ छगन तायडे, किरण पाटील, ललित नारखेडे यांनी मंगळवार, १७ ऑक्टोबर रोजी रात्री संशयित दानिश शेख कलीम (२०, रा. पिरजादेवाडा मेहरुण), सोमनाथ जगदीश खत्री (२१, रा. जोशीवाडा, मेहरुण), आवेश बाबुलाल पिंजारी (२०, रा. मेहरूण) आणि एक अल्पवयीन मुलगा यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी चोरीच्या नऊ दुचाकी काढून दिल्या. या दुचाकी त्यांनी जळगाव, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि बीड जिल्ह्यातून चोरी केल्याची कबुली दिली.