जळगाव : महानगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या (भाजप-शिंदेसेना) नेत्यांनी आखलेली रणनीती यशस्वी ठरली असून, अर्ज माघारीच्या प्रक्रियेत अनेक दिग्गजांचा मार्ग मोकळा झाला आहे. प्रामुख्याने प्रभाग क्रमांक ७, १३, १६ आणि १९ मध्ये राजकीय विरोधकांनी आणि अपक्षांनी मोठ्या प्रमाणावर माघार घेतल्याने भाजप व शिंदेसेनेचे प्रत्येकी ६ उमेदवार बिनविरोध ठरले आहेत.
माघारीच्या अखेरच्या दिवशी विशेषतः राष्ट्रवादी (शरद पवार) पक्ष आणि उद्धवसेनेच्या उमेदवारांनी घेतलेली माघार ही महायुतीच्या नेत्यांनी पडद्यामागे केलेल्या यशस्वी वाटाघाटींचा परिणाम असल्याचे बोलले जात आहे. यामुळे मतदानापूर्वीच अनेक प्रभागांत गुलाल उधळला गेला आहे.
नातलग, कार्यकर्त्यांची सरशी
आमदार सुरेश भोळे यांच्या कुटुंबातील आणि निकटवर्तीयांचाही विजयाचा मार्ग सुकर झाला. त्यांचे जवळचे नातेवाईक विश्वनाथ उर्फ विरेन सुरेश खडके यांनी प्रभाग १६ 'अ' मधून तर वैशाली अमित पाटील यांनी प्रभाग १३ 'क' मधून प्रतिस्पर्ध्याची माघार घडवून आणत बिनविरोधचा टप्पा गाठला आहे.
उद्धव सेना जिल्हा प्रमुखांच्या आईची भाजपसाठी माघार
भाजपने आपल्या बालेकिल्ल्यात विरोधकांना माघार घेण्यास भाग पाडले आहे. आमदार सुरेश भोळे यांचे पुत्र विशाल भोळे (प्रभाग ७ 'क') यांच्यासाठी अपक्ष नितीन मनोहर पाटील, नितीन रामचंद्र नन्नवरे, अॅड. नितीन पुंडलिक देवराज आणि जितेंद्र सुभाष चव्हाण यांनी रिंगणातून माघार घेतली.
अंकिता पाटील (प्रभाग ७ 'क') यांच्यासाठी उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांच्या आई व उद्धवसेनेच्या उमेदवार सुमन वीरभान पाटील यांच्यासह अपक्ष जयश्री नितीन पाटील, रजनी प्रकाश अत्तरदे, कल्पना जितेंद्र चव्हाण आणि शोभा भीमराव पाटील यांनी माघार घेतली. दीपमाला काळे (प्रभाग ७ 'अ') यांच्यासाठी उद्धवसेनेच्या जयश्री भिकन हिवराळे यांनी आपला अर्ज मागे घेतला. आमदारांचे नातेवाईक असलेले विश्वनाथ सुरेश खडके (प्रभाग १६ 'अ') यांच्यासाठी मनसेचे अविनाश भास्कर पाटील आणि अपक्ष प्रवीण विष्णू माळी यांनी माघार घेतली.
शिंदेसेनेसाठी यांनी सोडले मैदान
माजी महापौर राखी सोनवणे यांचा मुलगा सागर श्यामकांत सोनवणे (प्रभाग २ 'अ') यांच्यासाठी माजी नगराध्यक्ष चत्रभुज सोनवणे यांचे पुत्र अक्षय सोनवणे, अश्विन सैंदाणे, श्यामकांत बळीराम सोनवणे आणि कांचन विकास सोनवणे यांनी माघार घेतली. रेखा चुडामण पाटील (प्रभाग १९ 'अ') यांच्यासाठी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या सरला सुनील सोनवणे आणि अपक्ष सुजाता सतीश चौधरी यांनी माघार घेतली. विक्रम उर्फ गणेश सोनवणे (प्रभाग १९ 'ब') यांच्यासाठी राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उज्ज्वल सुरेश पाटील, स्वराज्य शक्त्ती सेनेचे केशव दिलीप पाटील आणि अपक्ष अनिल प्रकाश पाटील यांनी माघार घेतल्याने त्यांचा विजय सुकर झाला आहे.
शिंदेसेनेचे तीन उमेदवार बिनविरोध निश्चित
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदेसेनेनेही शुक्रवारी तीन जागांवर बिनविरोध यश मिळवले. माजी महापौर राखी सोनवणे यांचे पुत्र सागर श्यामकांत सोनवणे (प्रभाग २ 'अ') यांचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच प्रभाग १९ मध्ये शिंदेसेनेने पूर्ण वर्चस्व मिळवले असून, येथून रेखा चुडामण पाटील (प्रभाग १९ 'अ') आणि गणेश उर्फ विक्रम सोनवणे (प्रभाग १९ 'ब') हे बिनविरोध निवडून येणार आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
वैशाली पाटील यांच्यासाठी १० उमेदवारांची माघार
वैशाली अमित पाटील (प्रभाग १३ 'क') यांच्या प्रभागात सर्वात मोठी माघार पाहायला मिळाली. येथे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या पारूबाई पांडुरंग पाटील यांच्यासह मंगला बारी, सुमती नाईक, प्रतिभा कंखरे, संस्कृती ढेकळे, राधिका शिरसाठ, राखी मुंदडा, देवयानी कोल्हे, कामिनी शास्त्री आणि पूजा चंदनकर अशा १० जणांनी माघार घेतल्याने वैशाली पाटील यांचा मार्ग मोकळा झाला.
Web Summary : Jalgaon's BJP-Shinde Sena alliance secured 12 seats unopposed due to strategic withdrawals by opponents. Key leaders' relatives also benefited. Uddhav Sena leaders withdrew for BJP candidates, simplifying victory.
Web Summary : जलगांव में भाजपा-शिंदे सेना गठबंधन ने विरोधियों की रणनीतिक वापसी से 12 सीटें निर्विरोध जीतीं। प्रमुख नेताओं के रिश्तेदारों को भी फायदा हुआ। उद्धव सेना के नेताओं ने भाजपा उम्मीदवारों के लिए नाम वापस लिया, जिससे जीत आसान हो गई।