जळगाव : शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट केल्याच्या कारणावरून आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह आंदोलकांनी जळगाव महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता फारूख शेख यांना त्यांच्या खुर्चीवर दोरीने बांधले. या प्रकरणी संध्याकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास आमदार मंगेश चव्हाण यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
चाळीसगाव तालुक्यातील शेतक-यांचा वीज पुरवठा खंडीत केल्याच्या कारणावरून आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह शेतकरी शुक्रवारी दुपारी जळगाव येथील वीज कंपनीच्या कार्यालयात आले. यावेळी आमदार चव्हाण यांनी अधीक्षक अभियंत्यांना वीज कनेक्शन कट केल्याबाबत जाब विचारला. अधीक्षक अभियंत्यांनी आमदारांसह आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान आमदारांनी शेख यांना शिवीगाळ करीत त्यांच्या अंगावर वीज बिल फेकले. त्यानंतर संतप्त आमदार व आंदाेलकांनी शेख यांना त्यांच्याच खुर्चीला दोरीने बांधून ठेवले. त्यानंतर आमदारासह आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयात आले. या प्रकरणी वीज कंपनीच्या अभियंत्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक डाॅ.प्रवीण मुंडे यांनी स्वत: जिल्हाधिकारी कार्यालयात येत आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह काही आंदोलकांना ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी काही शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट केल्याच्या कारणावरून महावितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांना दोरीने बांधल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या प्रकरणी आमदारासह संशयितांना ताब्यात घेतले आहे.
-डाॅ.प्रवीण मुंडे, पोलीस अधीक्षक, जळगाव.