जळगावात तळघरातील मेडिकल स्टोअर फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2018 19:43 IST2018-12-31T19:39:29+5:302018-12-31T19:43:25+5:30
जळगाव शहरातील मणियार मैदानाच्या मागील अंकुर हॉस्पिटलच्या तळघरातील साईप्रसाद मेडिकल स्टोअर एका अज्ञात चोरट्याने टॉमीच्या साहाय्याने फोडून ४० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली़

जळगावात तळघरातील मेडिकल स्टोअर फोडले
जळगाव : शहरातील मणियार मैदानाच्या मागील अंकुर हॉस्पिटलच्या तळघरातील साईप्रसाद मेडिकल स्टोअर एका अज्ञात चोरट्याने टॉमीच्या साहाय्याने फोडून ४० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना रविवारी सकाळी ९़१५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली़ हा चोरटा हॉस्पिटलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून चोरी करण्याआधी त्याने हॉस्पिटलचे दार दोराच्या साहाय्याने बंद केल्याचे त्यात दिसून आले आहे़
संदीप निवृत्ती पाटील हे गिरणा टाकी परिसरात वास्तव्यास असून त्यांचे मणियार ग्राऊंडमागे असलेल्या अंकुर हॉस्पिटलमध्ये साईप्रसाद नावाचे मेडिकल आहे. या मेडिकलवर जितेंद्र नामदेव मोतीराळे (रा. मामलदे, ता. चोपडा) हा कामाला असून तो दररोज सकाळी ९ वाजता मेडिकल सुरू करून रात्री ९ वाजता मेडिकल बंद करतो. शनिवारी रात्री जितेंद्र हा नेहमीप्रमाणे रात्री ९ वाजता मेडिकलला कुलूप लावून घरी निघून गेला. रविवारी सकाळी ९.१५ वाजेच्या सुमारास जितेंद्र हा मेडिकल उघडण्यासाठी आला असता त्याला मेडिकलच्या दरवाजाचा कडी कोयंडा तुटलेला दिसला. यावेळी जितेंद्रने याबाबतची माहिती तत्काळ संदीप पाटील यांना फोनवरून दिली. संदीप पाटील हे काही वेळातच आपल्या मेडिकलवर दाखल झाले. त्यांनी मेडिकलमध्ये जाऊन बघितले असता. त्यांना मेडिलकलच्या गल्ल्यातील ४० हजार रुपयांची रोकड लंपास झाल्याचे दिसून आले़ याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़