जळगाव : सहाच दिवसात धरणातील जलसाठा २ टक्क्यांनी कमी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2023 14:35 IST2023-04-08T14:35:08+5:302023-04-08T14:35:32+5:30
गिरणा ३० तर हतनूरमध्ये ६३ टक्के जलसाठा : २५ लघु प्रकल्पातील साठा शून्यावर

जळगाव : सहाच दिवसात धरणातील जलसाठा २ टक्क्यांनी कमी!
कुंदन पाटील
जळगाव : यंदा ऐन एप्रिल महिन्यातही तापमानाचा पारा पस्तीशीच्या घरात असतानाही गेल्या सहा दिवसात जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पातील जलसाठा २ टक्क्यांनी ओसरला आहे. तर २५ लघु प्रकल्पातील जलसाठा शून्यावर आला आहे. त्यामुळे एप्रिलअखेरीस हा साठा अखेरची घटका मोजतो की काय, याचीच भीती वाटायला लागली आहे.
मार्च महिन्यात अवकाळी ढगाळ वातावरण होते.तशातच अवकाळी पावसानेही हजेरी लावली. त्यामुळे तापमानाचा पारा हा ३५ अंश सेल्सिअसवरच थांबला. ऐन उन्हाळ्यात तापमानाचा पारा कमी असताना उन्हाच्या चटक्यापासून दिलासा मिळाला. तर एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाही अवकाळी पावसासह ढगाळ वातावरण कायम राहिले. त्यामुळे भर उन्हाळ्यातही अनेकांना गारवा अनुभवता आला. एकीकडे उन्हाचा तडाखा नसतानाही जिल्ह्यातील प्रकल्पामधील जलसाठा गेल्या सहा दिवसात दोन टक्क्यांनी घसरला आहे. त्यामुळे तापमानात वाढ झाल्यावर या साठ्याची स्थिती चिंताजनक होईल, असेच जाणकारांकडून सांगण्यात येत आहे.
२५ प्रकल्प शून्यावर
जिल्ह्यात ३ मोठे जलप्रकल्प आहेत. त्यात गिरणा, हतनूर, वाघूरचा समावेश आहे. तर ९६ लघुप्रकल्प आहेत. त्यातील २५ प्रकल्पातील जलसाठा दि.६ एप्रिल रोजी शून्यावर आला असल्याची नोंद पाटबंधारे विभागाने घेतली आहे. त्यात चाळीसगाव तालुक्यातील ब्राम्हणशेवगा, कुंझर, वलठाण, राजदेहरे, देवळीभोरस, भडगावच्या पथराड, पारोळ्यातील खोलसर, सावरखेडा, बोळे, एरंडोलच्या पद्मालय, पाचोऱ्यातील वाकडी, लोहारा, उमरदे, जामनेरच्या मोहाडी, मोयखेडा दिगर, भागदरा, लहासर, शिरसोली-नेहरे,देव्हारी,सुनसगाव, भुसावळच्या खंडाळे, मोंढाळे, साळसिंगी, जुनोना, जळगावच्या विटनेर व एरंडोलच्या भालगाव लघुप्रकल्पातील साठा शून्यावर आला आहे.
सहा दिवसात कमी झालेला जीवंत जलसाठा
प्रकल्प - दि.२८ मार्च - ६ एप्रिल
हतनूर- ६५.८८ - ६३.४१
गिरणा- ३२.६४- ३०.४३
वाघूर- ७६.४७ - ७४.१२
मन्याड- ४८.७१ - २८.५५
सुकी- ७२.६२- ७०.९२
अग्नावती- ३१.३७- २६.४०
हिवरा- ३०.४६ - २७.३५
बहुळा- ४२.३५- ३८.३५
अंजनी- ४.९९- ३४.५४
भोकरबारी- ०४.९३- ०४.१६
गूळ- ७४.४२- ७३.६३
बोरी- २६.४८- २३.३८