जळगाव : लांडग्याच्या हल्ल्यात दोन बालकांसह आठ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 16:26 IST2023-04-17T16:25:56+5:302023-04-17T16:26:45+5:30
रविवार मध्यरात्रीचा थरार

जळगाव : लांडग्याच्या हल्ल्यात दोन बालकांसह आठ जखमी
मनीष चव्हाण
पाल, जि. जळगाव : पाण्याच्या शोधात असलेल्या एका लांडग्याने अंगणात झोपलेल्या लोकांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात आठजण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये चार महिला व दोन बालकांचाही समावेश आहे. ही घटना रविवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास पाल -गारबर्डी, ता. रावेर येथे घडली. यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
या हल्ल्यात पाल येथील कैलाश किशन बूनकर (५८), लक्ष्मण दिवालसिंग पावरा (८), समाधान रमेश पावरा (१२), वेलबाई अमरसिंग हारेगा (६५), खावलिबाई खुमाऱ्या बारेला (५०), आनीबाई रायसिंग पावरा (५५), भीमसिंग राख्या बारेला (५०) आणि बायजाबाई गंगाराम पावरा (५०) हे जखमी झाले आहेत.
गावकऱ्यांनी आरडाओरड केल्यानंतर लांडग्याने घटनास्थळावरून पळ काढत आपला मोर्चा शेतशिवाराकडे वळविला. जखमींना पाल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी वन विभागाशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली.
बाहेर अंगणात झोपू नका... दवंडी
पाल परिसरात झालेल्या या हल्ल्यामुळे रात्री कोणीही बाहेर अंगणात झोपू नये, असे आवाहन वनविभागाने केले आहे. याबाबत परिसरात दवंडी देण्यात आली आहे. कदाचित वन्यप्राणी पुन्हा हल्ला करू शकतो. यामुळे पाल परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
ज्या प्राण्याने हल्ला केला तो लांडगा आहे की तडस याबाबत आताच सांगता येणार नाही. हल्ला केला तो प्राणी पिसाळलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर झोपू नये. वनविभागातर्फे ट्रॅप कॅमेरे लावण्यात येत आहेत. तसेच रात्रीची गस्त सुरू करण्यात आली आहे.
अमोल चव्हाण,
वनक्षेत्रपाल, पाल, ता. रावेर