Jalgaon: डमी ग्राहकाने उधळला ‘ड्रग्ज’चा बाजार, आठ दिवसांपासून पोलिसांचा ‘वॉच’
By विजय.सैतवाल | Updated: March 20, 2024 22:42 IST2024-03-20T22:40:56+5:302024-03-20T22:42:13+5:30
Jalgaon News: मुंबईतून आलेले अमली पदार्थ विक्रीसाठी दोघे जण फिरत असताना ग्राहक हाती लागल्याचे त्यांना समाधान झाले, मात्र ग्राहक बनून गेलेल्या ‘डमी’नेच भुसावळातील ड्रग्जचा बाजार उधळून लावला.

Jalgaon: डमी ग्राहकाने उधळला ‘ड्रग्ज’चा बाजार, आठ दिवसांपासून पोलिसांचा ‘वॉच’
- विजयकुमार सैतवाल
जळगाव - मुंबईतून आलेले अमली पदार्थ विक्रीसाठी दोघे जण फिरत असताना ग्राहक हाती लागल्याचे त्यांना समाधान झाले, मात्र ग्राहक बनून गेलेल्या ‘डमी’नेच भुसावळातील ड्रग्जचा बाजार उधळून लावला. विशेष म्हणजे पोलिस पथक गेल्या आठवड्यापासून सापळा रचून होते. पक्की खबर मिळताच दोघे जाळ्यात अडकण्यासह लाखोचे अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले.
विक्रीसाठी पुरवण्यात आलेले अमली पदार्थ घेऊन फिरणाऱ्या दोघांकडून भुसावळ येथे ७२ लाख ८० हजार रुपये किमतीचे अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करताना पोलिसांनी गुप्तता पाळत आठ दिवसांपासून जाळे टाकून ठेवले होते.
जास्त मिळेल का?
भुसावळ येथे अमली पदार्थ विक्रीप्रकरणी अटक केलेल्या कुणाल भारत तिवारी (३०, रा. तापीनगर, भुसावळ) आणि जोसेफ जॉन वालाड्यारेस (२८, रा. कंटेनर यार्ड, भुसावळ) हे दोघेही उच्चशिक्षित असून सधन कुटुंबातील आहेत. अमली पदार्थ विक्रीचा हा त्यांचा पहिलाच प्रसंग. काही पैस मिळणार म्हणून त्यांनी हे अमली पदार्थ हाती घेतले व ग्राहकांच्या शोधात निघाले. यात पोलिसांनी चार दिवसांपूर्वी डमी ग्राहक पाठविला व त्याने अमली पदार्थाच्या तीन-चार पुड्या दोघांकडून घेतल्या. त्यानंतर मंगळवारी पुन्हा डमी ग्राहक दोघांकडे गेला व जास्त ड्रग्ज मिळेल का म्हणून विचारणा केली. त्यांनी होकार दिला व ‘डमी’ने खरेदीची तयारी दाखवली. त्याच वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचून असलेल्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. दोघांनी काही प्रमाणात माल विक्री केला होता. मात्र मोठ्या प्रमाणातील ड्रग्ज इतरत्र पोहचण्यापूर्वीच पोलिसांनी जप्त केले.
जास्त भावाने मागणी
दोघं तरुण ग्राहकांच्या शोधात असल्याने डमी ग्राहकाने जास्त ड्रग्जची मागणी तर केलीच शिवाय पाच हजार रुपये प्रति ग्रॅम अशा वाढीव भावाने खरेदीचीही तयारी दाखवली. त्यामुळे दोघे तरुण पोलिसांच्या सापळ्यात अलगद अडकले.
पुरवठादारावर तीन गुन्हे
दोघं तरुणांकडे अमली पदार्थ विक्रीसाठी देणारा दिपेश मुकेश मालवीय (रा. वरणगाव रोड, भुसावळ) याच्यावर या पूर्वीच तीन गुन्हे दाखल आहेत. त्याच्या चौकशीतून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
एका पथकाने मुंबईतून आणखी एकाला उचलले
भुसावळ येथील अमली पदार्थ विक्री प्रकरणात हा माल मुंबई येथून आल्याची माहिती तपासात समोर आली. त्यानुसार भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्याचे एक पथक मुंबईला रवाना झाले. तेथून आणखी एका जणाला ताब्यात घेतले आहे.