ITI मध्ये फक्त ४० टक्के प्रवेश निश्चिती; आतापर्यंत ३९८३ विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश
By सागर दुबे | Updated: August 25, 2022 16:58 IST2022-08-25T16:56:20+5:302022-08-25T16:58:23+5:30
जळगाव जिल्ह्यात ITI साठी ९ हजार ८२८ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.

ITI मध्ये फक्त ४० टक्के प्रवेश निश्चिती; आतापर्यंत ३९८३ विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ९ हजार ८२८ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. चौथी फेरी सुध्दा लवकरच संपणार असून मात्र, विद्यार्थ्यांचा प्रवेश घेण्याकडे कल कमी झालेला दिसत आहे. आतापर्यंत ३ हजार ९८३ विद्यार्थ्यांनीच प्रवेश घेतले आहेत. केवळ ४० टक्के प्रवेशच निश्चित होऊ शकले आहेत. विशेष म्हणजे शनिवारी चौथी फेरी संपणार आहे.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे आयटीआय प्रवेशासाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या प्रवेशाची तीन फेरीतील प्रक्रिया पूर्ण झाली आहे. चौथी फेरी ही शनिवार २७ ऑगस्ट रोजी संपणार आहे. दरम्यान, यंदा जळगाव जिल्ह्यातील ८८ शासकीय व खाजगी आयटीआयमधील ९ हजार ८२८ जागांसाठी १३ हजार ९८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. आयटीआयमधील दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रोजगार, व्यवसायाची संधी असल्याने यंदा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळालेला पहायला मिळाला.
ही आहे प्रवेशाची टक्केवारी
जळगाव जिल्ह्यातील १३ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) आहेत. या संस्थांमध्ये ३ हजार ५९२ जागा आहेत. आतापर्यंत २ हजार ५९४ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला असून ७२.२२ टक्के प्रवेश झालेले आहेत. विद्यार्थ्यांचा शासकीय संस्थांकडे कल अधिक आहे. त्याशिवाय ७५ खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थाही जिल्ह्यात असून या संस्थांमधील ६ हजार १३६ जागांसाठी ही प्रक्रिया राबविली जात आहे. मात्र, अद्याप या जागांवर १ हजार ३८९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून २२.६४ टक्केच प्रवेश झाले आहेत.
उद्या अर्जाची अंतिम मुदत
१७ जूनपासून आयटीआयची प्रवेश प्रक्रिया प्रारंभ झाली आहे. २९ जुलै ते ३ ऑगस्ट पहिली तर ३० जुलै ते १२ ऑगस्टपर्यंत द्वितीय तसेच ८ ते २० ऑगस्टपर्यंत तिसरी फेरी राबविण्यात आली. आता १७ ते २७ ऑगस्टपर्यंत चौथी फेरी होईल. दरम्यान, जे उमेदवार प्रवेश अर्ज करू शकले नाहीत, अशांना समुपदेश फेरीमध्ये संधी उपलब्ध करून देण्यासाठी १ ते २७ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या.
सोमवारी गुणवत्ता यादी होणार प्रसिध्द
सुमपदेशन फेरीसाठी पात्र उमेदवार व नव्याने अर्ज भरलेल्या उमेदवारांची समुपदेशन फेरीसाठी एकत्रित गुणवत्ता यादी सोमवारी २९ ऑगस्ट रोजी प्रसिध्द होईल. ३० ते २१ ऑगस्ट या कालावधीत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील समुपदेशन फेरीसाठी नोंदणी करावी लागणार आहे. १ सप्टेंबरला संस्थानिहाय गुणवत्ता यादी प्रकाशित होईल व समुपदेशन फेरीसाठी वेळ दिनांक देण्यात येईल. २ ते ५ सप्टेंबरमध्ये जागांचे वाटप होईल व विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल.