Jalgaon: अमळनेर दंगलीतील आरोपीचा मृत्यू, शहरात तणावपूर्ण शांतता
By संजय पाटील | Updated: June 14, 2023 22:01 IST2023-06-14T21:59:09+5:302023-06-14T22:01:04+5:30
Jalgaon: अमळनेर शहरातील दंगल प्रकरणात अटकेत असलेला आरोपी व माजी नगरसेवकाचा मुलगा अशपाक ऊर्फ पक्या सलीम शेख (३३, रा.गांधलीपुरा, अमळनेर) याचा बुधवारी मृत्यू झाला.

Jalgaon: अमळनेर दंगलीतील आरोपीचा मृत्यू, शहरात तणावपूर्ण शांतता
- संजय पाटील
अमळनेर (जि. जळगाव) - शहरातील दंगल प्रकरणात अटकेत असलेला आरोपी व माजी नगरसेवकाचा मुलगा अशपाक ऊर्फ पक्या सलीम शेख (३३, रा.गांधलीपुरा, अमळनेर) याचा बुधवारी मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच शहरात सायंकाळी दुकाने पटापट बंद होऊन नागरिकांची पळापळ सुरू झाली. पोलिस यंत्रणा तत्काळ सतर्क झाल्याने तणावपूर्ण शांतता होती.
शहरात ९ रोजी रात्री किरकोळ कारणावरून जिनगर गल्ली, सराफ बाजार, सुभाष चौक भागात दगडफेक झाली होती. त्यात सहा पोलिस कर्मचारी जखमी झाले होते. रात्रीच पोलिसांनी २९ आरोपींना अटक केली होती. १३ आरोपींना १४ पर्यंत पोलिस कोठडी, तर १८ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिस कोठडीत असलेला माजी नगरसेवक सलीम शेख ऊर्फ टोपी यांचा मुलगा अशपाक ऊर्फ पक्या सलीम शेख याची सोमवार १२ रोजी रात्री प्रकृती बिघडल्याने त्याला जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी सायंकाळी उपचार घेताना अशपाक याचा मृत्यू झाला.
दरम्यान, अमळनेर शहरातील संवेदनशील व महत्त्वाच्या भागात बुधवारी सायंकाळी पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. जळगावसह इतर विविध ठिकाणांहून जादा बंदोबस्त मागवण्यात आला आहे. मृत अशपाकचे इनकॅमेरा पोस्टमार्टेम करण्यात आले.