Jalgaon city polls drop by 5% in 6 months | १४ महिन्यातच जळगाव शहराच्या मतदानात १२ टक्क्यांची घट

१४ महिन्यातच जळगाव शहराच्या मतदानात १२ टक्क्यांची घट

अजय पाटील 
जळगाव : शहरातील रस्त्यांची समस्या, मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृतीत प्रशासनाला आलेले अपयश व दोन दिवसांपासून शहरात सुरु असलेली पावसाची रिपरिप यामुळे मतदानाच्या टक्केवारीत कमालीची घट झाली आहे. शहरात अंदाजे ४५.१४ टक्के मतदान झाले असून, मनपा निवडणुकीनंतर अवघ्या १४ महिन्यातच शहरातील मतदानाच्या टक्केवारीत १२ टक्क्यांची घट झाली आहे.
आॅगस्ट २०१८ मध्ये मनपा निवडणुकीसाठी शहरात ५७ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर एप्रिल २०१९ झालेल्या लोकसभा निवडणुकीत ४९ टक्के मतदान झाले होते. सहा महिन्याच्या अंतरातच शहरातील मतदानाच्या टक्केवारीत ८ टक्के घट झाली होती. विधानसभा निवडणुकीत स्थानिक उमेदवार शहरातील समस्यांच्या प्रश्न असतो त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत वाढ होईल अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी उलट स्थिती दिसून आली. शहरात केवळ ४५.१४ टक्के मतदानाची नोंद झाली असून, लोकसभेच्या निवडणुकीनंतर अवघ्या पाच महिन्यातच ४ टक्के घट झाली आहे. केवळ १४ महिन्यांचा अंतरातच शहराच्या मतदानाच्या टक्केवारीत १२ टक्क्यांची घट का झाली ? याबाबत राजकीय पक्ष व प्रशासनाने विचारमंथन करण्याची गरज आहे.
मतदानाच्या टक्केवारीत वाढ न होण्याची ही आहेत कारणे
गेल्या दोन दिवसांपासून शहरात पावसाची रिपरिप सुरु होती. त्यामुळे अनेक भागातील रस्त्यांवर पाणी साचले होते तसेच वाढीव भागांमध्ये रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल पसरल्यामुळे पायी चालणेही कठीण होते. त्यामुळे नागरिकांमध्ये निरुत्साह जाणवला. नागरिकांनी मतदान केंद्रापर्यंत जाणे टाळले असावे.
अमृत योजनेच्या कामामुळे शहरातील रस्त्यांची अक्षरश वाट लागली आहे. वर्षभरापासून नागरिक शहरातील खड्डयांच्या समस्येमुळे त्रस्त आहे. खड्डयांचा प्रश्नावर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पहायला मिळाली होती. त्यामुळे अनेकांनी मतदानातून बदल न करता मतदानापासून दुर राहणेच पसंत केल्याचे दिसून येत आहे.
प्रत्येक नागरिकाला मतदान करता यावे यासाठी प्रशासनाकडून सोमवारी शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली होती. काही कंपन्यांनीही कामगारांना सुट्टी दिली होती. मात्र, रविवार व सोमवारची सलग सुट्टी आल्यामुळे अनेक मतदारांनी मतदानाचा हक्क न बजावता सुट्टीचा आनंद घेतला.
बीएलओंवर मतदारांपर्यंत मतदान चिठ्ठया पोहचविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र, मतदारांपर्यंत या चिठ्ठया पोहचल्याच नाहीत. तसेच ज्या चिंठ्ठया पोहचल्या त्यात मतदान केंद्राचे नावच नव्हते. त्यामुळे देखील अनेकांनी मतदानकेंद्राकडे पाठ फिरवल्याचे चित्र पहायला मिळाले.
मनपा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर झाला होता. त्यामुळे नगरसेवक, पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मतदान काढण्यावर अधिक भर देण्यात आला होता.तसेच प्रशासनाकडूनही जागृतीसाठी चांगले प्रयत्न झाले होते. शहराची निवडणूक हवी तशी प्रतिष्ठेची नव्हती. यावेळी नगरसेवकांनीही फार प्रयत्न केले नाहीत.

Web Title: Jalgaon city polls drop by 5% in 6 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.