जळगाव शहरात बस चालकाला कॅबिनमधून काढून बेदम मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 23:51 IST2018-04-03T23:51:36+5:302018-04-03T23:51:36+5:30
गतीरोधकाजवळ वेग कमी केल्याने मागे चालणारी कार एस.टी. बसवर धडकल्याने संतापलेल्या कारमधील तिघांनी बस चालकाला कॅबिनमधून बाहेर काढून बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी चार वाजता महामार्गावर शिव कॉलनी थांब्याजवळ घडली. याप्रकरणी कारमधील तिघांविरुध्द रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरात बस चालकाला कॅबिनमधून काढून बेदम मारहाण
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,३ : गतीरोधकाजवळ वेग कमी केल्याने मागे चालणारी कार एस.टी. बसवर धडकल्याने संतापलेल्या कारमधील तिघांनी बस चालकाला कॅबिनमधून बाहेर काढून बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवारी दुपारी चार वाजता महामार्गावर शिव कॉलनी थांब्याजवळ घडली. याप्रकरणी कारमधील तिघांविरुध्द रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, संतोष भिका बाविस्कर (रा.निवृत्ती नगर, जळगाव) हे जळगाव आगारात चालक म्हणून नोकरीला आहेत. मंगळवारी वाहक संगीता पाचपोळ यांच्यासोबत जुन्या बसस्थानकातून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात प्रवाशी असलेली एस.टी.बस (एम.एच. १४ बी.टी. १३२९) घेऊन जात असताना राष्ट्रीय महामार्गावरुन शिवकॉलनीजवळ गतीरोधकाजवळ पुढे चालणारी वाहने थांबलेली होती, त्यामुळे बाविस्कर यांनी बस थांबविली. याच बसमागून येत असलेली कार (क्रमांक एम.एच. १९ सी.एच.५२७७) बसवर आदळली. त्यात दोन्ही वाहनांचे किरकोळ नुकसान झाले. प्रदीप अशोक मते, अशोक नामदेव मते व सुभाष नामदेव मते (रा.खोटेनगर, जळगाव) या तिघांनी बस चालकाशी वाद घातला. त्यानंतर थोड्यावेळाने काही जणांना बोलावून घेत बाविस्कर यांना मारहाण करण्यात आली.
सायंकाळपर्यंत तडजोडीचे प्रयत्न
या घटनेनंतर बस चालकाने रामानंद नगर पोलीस स्टेशन गाठले. तेथे तक्रार देऊ नये म्हणून अनेक जणांच्या माध्यमातून चालकावर दबाव टाकला जात होता तर कधी विनंती केली जात होती. शेवटी सायंकाळी कारमधील तिघांविरुध्द मारहाण व शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.