Jalgaon: कांद्यापाठोपाठ लसूणही महागली, भाव ३०० रुपयांवर गेल्याने ‘झणझणीत’ स्वाद फिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2023 13:41 IST2023-12-12T13:39:56+5:302023-12-12T13:41:37+5:30
Jalgaon News: पांढऱ्या लसणाने यंदाचा विक्रमी भाव घेतला आहे. ३०० रुपयांवर भिडलेला हा लसूण स्वयंपाक घरातल्या गृहिणींना चांगलाच झोंबायला लागला आहे. लसणाच्या तेजीमुळे आता हॉटेल्स व्यावसायिकांनी हात आवरता घेतल्याने ‘तडाका’ही आता फिकट जाणवायला लागला आहे.

Jalgaon: कांद्यापाठोपाठ लसूणही महागली, भाव ३०० रुपयांवर गेल्याने ‘झणझणीत’ स्वाद फिका
- कुंदन पाटील
जळगाव - पांढऱ्या लसणाने यंदाचा विक्रमी भाव घेतला आहे. ३०० रुपयांवर भिडलेला हा लसूण स्वयंपाक घरातल्या गृहिणींना चांगलाच झोंबायला लागला आहे. लसणाच्या तेजीमुळे आता हॉटेल्स व्यावसायिकांनी हात आवरता घेतल्याने ‘तडाका’ही आता फिकट जाणवायला लागला आहे.
बेमोसमी पावसासह वादळामुळे लसणाचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे डिसेंबरमध्ये येणारा नव्या लसणाची आवक घसरली आहे. त्यामुळे पांढरा लसूण ३०० रुपये प्रतिकिलोने विक्री होत आहे. तर गावरानी लसूण बाजारात अत्यल्प प्रमाणात उलपब्ध आहे. ४०० ते ४५० प्रतिकिलोन दराने गावरानी लसणाची विक्री होत आहे.
का वाढले दर?
प्रतिकूल हवामान आणि अवकाळी पावसाचा फटका पिकांवर पडल्याने पिकांच्या खराब उत्पादनामुळे लसणाच्या दरात वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यपासून २०० ते २५० रुपये किलो असलेला लसूण आता ३०० ते ४५० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
कांदाही रडवतोय
ओला लाल कांदा सध्या पन्नाशी ओलांडून बसला आहे. तर जुना रांगडा कांदा ६० ते ७० रुपयांवर गेला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना कांदाही रडवायला लागला आहे.
भाजीपाल्यांचे प्रतिकिलो दर
मिरची-६०
मेथी-८०
पालक-२० (जुडी)
भेंडी-७०
वांगी-५०
कोथिंबीर-६०
भरताचे वांगी-५०