जळगावात नातेवाईकांकडे जात असलेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला. बोर घाटातून जात असताना एका मालवाहू वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत बाप- लेकाचा जागीच मृत्यू झाला. तर, माय- लेक गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेनंतर मालवाहू वाहनचालक घटनास्थळावरून पसार झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाईला सुरुवात केली.
पिंटू मोहन बडोले (वय, ३०) आणि त्याचा मुलगा रितिक बडोले (वय, ३) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर, पिंटूची पत्नी मालूबाई (वय, २८) आणि थोरला मुलगा टेंगुराम (वय, ८) या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बडोले कुटुंब आज सकाळी दुचाकीने पाल येथील नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असताना बोर घाटात खरगोनकडून येणाऱ्या एका मालवाहू ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की, पिंटू त्याची पत्नी मालूबाई आणि दोन्ही मुले दूरवर फेकले गेले. या अपघातात पिंटू आणि रितिक यांचा जागीच मृत्यू झाला. तर, मालूबाई आणि टेंगुराम हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर फैजपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी मालवाहू वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.