जळगाव : चाकूचा धाक दाखवून सराफाकडील ३७ लाखांचा ऐवज लुटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2022 22:04 IST2022-11-30T22:04:04+5:302022-11-30T22:04:25+5:30
नरवेल रस्त्यावर सायंकाळचा थरार. झटापटीत व्यापारी जखमी.

जळगाव : चाकूचा धाक दाखवून सराफाकडील ३७ लाखांचा ऐवज लुटला
मुनाफ शेख
सराफाला चाकूचा धाक दाखवून दरोडेखोरांनी ३७ लाख रुपयांचे सोने- चांदीचे दागिने, रोख ८० हजार रुपये लूटून नेले. ही थरारक घटना नरवेल ता. मुक्ताईनगर रस्त्यावर बुधवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. या झटापटीत सराफ जखमी झाला आहे.
नरवेल येथील निलेश वसंत सोनार यांचे उचंदा येथे धनाई ज्वेलर्स हे दुकान आहे. बुधवारी सायंकाळी दुकान बंद करून ते नरवेल येथे दुचाकीने परत जात होते. त्याचवेळी नरवेलनजीक लक्ष्मण महाजन यांच्या शेताजवळ अज्ञात दरोडेखोरांनी मागून येऊन त्यांना दुचाकी आडवी लावली आणि चाकूचा धाक दाखविला. दरोडेखोरांनी दुचाकीची डिक्की दगडाने तोडून ३७ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. यामध्ये ७०० ग्रॅम सोने, तीन किलो चांदी व ८० हजार रुपये रोख रक्कम लूटून नेले. यानंतर काही क्षणातच दरोडेखोर पसार झाले. यावेळी झालेल्या झटापटीत सोनार यांच्या उजव्या हात व पायाला जखमा झाल्या.
घटनेची माहिती नरेंद्र दुट्टे, राजू तराळ ,मोहन बेलदार तसेच नरवेल गावचे सरपंच मोहन महाजन यांना कळताच त्यांनी घटनास्थळ गाठले .पोलीस अधीक्षक यांना भ्रमणध्वनीवरून या संदर्भात माहिती देण्यात आली. आमदार चंद्रकांत पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली.