Jalgaon Crime: रेल्वे रुळावर एक मृतदेह आढळला आणि नातेवाइकांनी ओळख पटवत त्याचे शवविच्छेदनही करून घेतले. अंत्यसंस्कारासाठी सर्व नातेवाईक घरी आले आणि रडारड सुरू झाली. मात्र, ज्यांच्या अंत्यसंस्काराची तयारी झाली, ते रघुनाथ वामन खैरनार हे घरच्यांसमोर येऊन उभे राहिले. यामुळे कुटुंबीय, नातेवाईकांना धक्का बसला आणि हा नेमकं घडलं या विचारात पडले. थोड्या वेळाने प्रत्यक्षात ज्या मृतदेहाची ओळख पटवली आणि अंत्यसंस्कारासाठी नेला जात होता तो दुसऱ्याचा असल्याचे त्यांच्या लक्षात आले एकच गोंधळ उडाला. मृतदेह दुसऱ्याचा असल्याचे समजल्यानंतर तो पुन्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला.
धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील रहिवासी रघुनाथ खैरनार हे घरी कोणाला काहीही न सांगता गेल्या तीन ते चार दिवसांपासून घरून निघून गेले होते. बेपत्ता असल्याने कुटुंबीय त्यांचा शोध घेत होते. अशातच शनिवारी सकाळी पाळधी गावाजवळच रेल्वे रुळावर एक मृतदेह आढळला. ही माहिती गावात पसरताच गावकऱ्यांसह बेपत्ता वृद्धाचे नातेवाईकही घटनास्थळी पोहोचले. मृतदेहाचा चेहरा छिन्नविछिन्न झाल्याने तो नीट ओळखता येत नव्हता. गावकरी, नातेवाईकांनी चेहऱ्याचा खालचा भाग पाहून तो रघुनाथ खैरनार यांच्याशी मिळताजुळता असल्याचे सांगितले. त्यांच्या कुटुंबियांनीही हा मृतदेह खैरनार यांचाच असल्याची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांसह नातेवाईक हा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात घेऊन आले आणि संध्याकाळी सगळी प्रक्रिया पार पडली.
रघुनाथ खैरनार यांच्या मृत्यूविषयी नातेवाइकांना कळवल्याने अंत्यसंस्कारासाठी सर्वजण त्यांच्या घरी पोहोचले होते. घरात बाबा गेल्याने सर्वजण रडत होते. मात्र संध्याकाळी सात वाजता रघुनाथ खैरनार हे साईबाबा मंदिराकडून येताना दिसले. घरापर्यंत ही बातमी पोहोचली आणि सर्व विचारात पडले. खैरनार घरात येताच कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का बसला व दुसरीकडे त्यांना जिवंत पाहून आनंदही झाला.
दुसरीकडे नातेवाईकांना रेल्वे रुळावरील मृतदेह शवविच्छेदन करून ताब्यात देण्यात आला होता. मात्र मृतदेह घरी आणत असताना रघुनाथ खैरनार घरी पोहोचल्याचे समजले आणि रुग्णवाहिका पुन्हा रुग्णालयाकडे नेण्यात आली. नातेवाईकांनी पाळधी पोलिसांना या घटनेची माहिती दिली आणि मृतदेह रुग्णालयाकडे सोपवला. अर्ध्या रस्त्यात नेलेला मृतदेह पोलिस आल्यानंतर रात्री ८:३० वाजता रुग्णालयात परत आणण्यात आला.