जामनेर येथे औषधी वनस्पती संशोधन संस्थेसाठी पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2018 18:11 IST2018-06-09T18:11:36+5:302018-06-09T18:11:36+5:30
देशभरातील दुर्मीळ औषधी वनस्पतींवर संशोधन व अध्यापन करणारी नॅशनल इन्स्टीट्यूट आॅफ मेडिसीनल प्लॉन्ट या संस्थेची जामनेरला उभारणी होणार आहे.

जामनेर येथे औषधी वनस्पती संशोधन संस्थेसाठी पाहणी
जामनेर : देशभरातील दुर्मीळ औषधी वनस्पतींवर संशोधन व अध्यापन करणारी नॅशनल इन्स्टीट्यूट आॅफ मेडिसीनल प्लॉन्ट या संस्थेची जामनेरला उभारणी होणार आहे. दिल्ली येथील आयुष मंत्रालयाच्या पथकाने शनिवारी जागेची पाहणी केली. अशा स्वरुपाची ही देशातील पहिलीच संस्था असेल, असे पथकातील सदस्यांनी सांगितले.
नॅशनल मेडिसीनल प्लाँट बोर्ड, दिल्ली येथील आयुष मंत्रालयातील उप मुख्यकार्यकारी अधिकारी पद्मप्रिया बाळकृष्ण, डॉ.एन.सी.अग्रवाल, डॉ.तनुजा नेसरी, डॉ.मिलींद निकम, डॉ.धनंजय कुलकर्णी, डॉ.संजय तलमले, डॉ. ऋशिकेश कोल्हे यांनी नगराध्यक्ष साधना महाजन व गिरीष महाजन यांचे स्विय सहाय्यक अरविंद देशमुख यांच्यासोबत गारखेडे परिसरातील जागेची पाहणी केली. या संशोधन केंद्रासाठी ५० एकर जागा लागणार आहे.
या प्रस्तावित संस्थेत औषधी वनस्पती विषयाशी निगडीत पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमासह संशोधनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्याचा उपयोग वनस्पतीशास्त्र विषयातील संशोधकांना होईल. खान्देशातील सातपुडा पर्वत क्षेत्रासह अजिंठा लेणी परिसरासह राज्यातील इतर भागात आढळणाऱ्या औषधी वनस्पतींची सखोल शास्त्रीय माहिती या संस्थेत ठेवली जाईल.
जामनेरला औषधी वनस्पती संशोधन संस्थेची ऊभारणी व्हावी यासाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरु होता. येत्या दोन वर्षात ५० एकर क्षेत्रात संस्थेची ऊभारणी होवुन कामास सुरुवात होईल. राज्यातील संशोधक व अभ्यासकांना याचा फायदा होणार आहे.
- गिरीष महाजन, जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री.