‘जलयुक्त’बाबत असंवेदनशीलता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 12:47 PM2018-04-30T12:47:16+5:302018-04-30T12:47:16+5:30

वार्तापत्र-महसूल

 Insensitivity about 'jalyukt' | ‘जलयुक्त’बाबत असंवेदनशीलता

‘जलयुक्त’बाबत असंवेदनशीलता

Next

सुशील देवकर
जलयुक्त शिवार योजनेच्या आता टप्पा ४ साठी गावांची नावे निश्चित करणे सुरू झालेले असताना अद्यापही टप्पा २ ची कामेच प्रलंबित आहेत.मात्र या कामांबाबत जिल्हा प्रशासन जितके असंवेदनशील आहे. तितकेच या जलसंधारण विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील असंवेदनशील आहेत. जळगाव जिल्ह्यातील अनेक विभागांची जलयुक्तची कामे रखडली आहेत. मात्र जशी जिल्हा प्रशासनाला त्याची फारशी फिकीर नाही, तशीच फिकीर राज्याच्या जलसंधारण विभागाला देखील नसल्याचे चित्र आहे. जळगाव येथील एका लग्न समारंभास उपस्थित राहण्यासाठी जलसंधारण विभागाचे सचिव येणार होते. मात्र लग्नसमारंभास सरकारी खर्चाने यायचे तर शासकीय कामे हवी. म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक व त्यानंतर जामनेर तालुक्यातील जलयुक्तच्या कामांची पाहणी करण्याचा कार्यक्रम ठरला. जलसंधारण सचिव आढावा घेणार म्हटल्यावर जिल्हा प्रशासनाला जाग आली. जलयुक्तच्या २०१६-१७च्या टप्पा २ मधील तब्बल १४ कामे अद्यापही बाकी असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधीतांना धारेवर धरले. कृषी विभागाची दोन कामे तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन अधिकाºयांनी दिले. मात्र जिल्हा परिषदेची मोठ्या प्रमाणावर कामे बाकी आहेत. सिमेंट बंधाºयांचीच काही कामे बाकी आहेत. त्यामुळे ही कामे कधी पूर्ण होणार? व त्यात पाणी कधी साठणार? असा सवाल उपस्थित होत आहे. १२ कामे वनविभागाच्या परवानगीअभावी अडली होती, त्यांची परवानगी २४ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत तातडीने देण्यात आली. जर ही तत्परता संवेदनशील प्रशासनाने आधीच दाखविली असती तर हे काम मार्गी लागून वेळेत पूर्ण झाले असते. मात्र सचिव आढावा घेणार म्हटल्यावर हे काम मार्गी लागले. विशेष म्हणजे या राहिलेल्या कामांना परवानगी देताच टप्पा २ मधील सर्व २२२ गावे जलयुक्त झाल्याची घोषणाही प्रशासनाने करून टाकली. या टप्पा २ मध्ये जामनेर तालुक्यातील सर्वाधिक २६ गावे, चाळीसगाव, पाचोरा, पारोळा तालुक्यातील प्रत्येकी २० गावांचा समावेश आहे. सध्या टंचाईची परिस्थितीही याच तालुक्यांमध्ये अधिक जाणवत आहे. सचिवांचा दौरा जाहीर झाल्याने त्यांना कोणते काम दाखवायचे? याचीही तयारी करण्यात आली. मात्र सचिवांनीही काही कामामुळे या दौºयाकडे पाठ फिरविली. आधीच दोन वर्षांपासून जिल्ह्यात अनेक भागात पुरेश्या प्रमाणात पाऊस न झाल्याने जलयुक्तचे काम झालेले बंधारे, तलाव कोरडेठाक आहेत. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. अशा परिस्थितीत निदान या पावसाळ्यापूर्वी तरी जलयुक्तची अपूर्ण कामे पूर्ण करून पावसाळ्यात जास्तीत जास्त पाणी साठविण्याचा प्रयत्न होणे अपेक्षित असताना प्रशासनाकडून त्याकडे सोयीस्कर दूर्लक्ष झाल्याचेच चित्र आहे. आता पावसाळ्यापूर्वी ही राहिलेली कामे पूर्ण झाली तरच त्यात पाणी साठू शकेल.

Web Title:  Insensitivity about 'jalyukt'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.