रावेरनंतर आता अन्य तालुक्यात चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:20 IST2021-09-12T04:20:27+5:302021-09-12T04:20:27+5:30
जळगाव : रावेर तालुक्यात तक्रारीनंतर दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत झालेल्या कामांची चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर, आता सर्वच तालुक्यात ...

रावेरनंतर आता अन्य तालुक्यात चौकशी
जळगाव : रावेर तालुक्यात तक्रारीनंतर दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत झालेल्या कामांची चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर, आता सर्वच तालुक्यात या योजनेंतर्गत झालेली कामे योग्य आहेत का नाही, याची तपासणी करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी सर्व गटविकास अधिकारी यांना दिल्या आहेत. समाज कल्याण विभागामार्फत याबाबतचे पत्र काढण्यात आले आहे.
या सर्व चौकशीचा अहवाल ३० दिवसांच्या आता सादर करण्याच्याही सूचना सीईओंनी दिल्याची माहिती आहे. रावेर तालुक्यात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विद्यमान सदस्य नंदकिशोर महाजन यांनी दलित वस्ती सुधार योजनेच्या ई-टेंडर यांच्या कामांमध्ये अनियमितता झाल्याची तक्रार सर्वसाधारण सभेत केली होती. त्यानुसार, चौकशी होऊन ३४ गावांमध्ये अनियमितता आढळून आली आहे. या निविदा रद्द करण्याची शिफारस चौकशी समितीने केली आहे. त्यानुसार, ३४ गावांना सरपंच व ग्रामसेवकांना नोटिसा देण्यात येणार होत्या, मात्र, नेमक्या त्या द्यायच्या कोणाला हे ठरले नसल्याने अद्याप याबाबत कारवाई झालेली नाही. आता रावेर वगळता अन्य जिल्ह्यातील कामांच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. पंचायत समिती स्तरावर २०२०-२१ या वर्षात दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत मंजूर कामांच्या ई-निविदा प्रक्रियेची सविस्तर चौकशी करून, सदर कामांच्या ई-निविदा प्रक्रिया विहीत शासकीय कार्यपद्धतीचा अवलंब करून राबविण्यात आली आहे अथवा नाही, याबाबत ग्रामपंचायत व कामनिहाय आपले स्वयंस्पष्ट अभिप्रायासह चौकशी अहवाल ३० दिवसांच्या आत सादर करावा, असे आदेशात म्हटले आहे. दरम्यान, हा शासकीय आदेशानुसार तपासणीचा नियमित भाग असतो, त्यानुसार, सर्व गटविकास अधिकाऱ्यांना पत्र दिल्याची माहिती समाजकल्याण अधिकारी विजय रायसिंग यांनी दिली.